AFG vs BAN Mohammad Nabi World Record : अफगाणिस्तानच्या संघाने युएईतील अबूधाबीच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशला ३-० असा धुव्वा उडवला. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानच्या संघानं २०० धावांनी विजय मिळवला. हा या मैदानातील धावांच्या दृष्टिने सर्वात मोठा विजय ठरला. याशिवाय अफगाणिस्तानच्या ताफ्यातील अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी याने इतिहास रचला. या पठ्यानं पाकिस्तानच्या खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला सुरुंग लावला आहे. इथं नजर टाकुयात वनडेत मोहम्मद नबीनं सेट केलेल्या नव्या विश्वविक्रमासंदर्भातील गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नबीनं ३७ चेंडूत केली ६२ धावांची खेळी
अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात २९३ धावा केल्या होत्या. यात मोहम्मद नबीनं ३७ चेंडूत ६२ धावा केल्या. त्याची ही खेळी ४ चौकार आणि ५ षटकाराने बहरली होती. या अर्धशतकासह त्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मिस्बाह उल हक याचा विक्रम मोडीत काढला आहे.
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
मिस्बाहला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
नबी वनडेत अर्धशतक झळकवणारा सर्वात वयस्क खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या बॅटरच्या नावे होता. ४० वर्षे आणि २८६ दिवस वय असताना नबीच्या भात्यातून वनडेत कडक अर्धशतकी पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या मिस्बाह उल हक याने ४० वर्षे २८३ दिवस एवढे वय असताना अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे वनडे सर्वाधिक वय असताना अर्धशतक झळकवण्याचा नवा विक्रम हा मोहम्मद नबीच्या नावे झाला आहे.
अफगाणिस्तानचा सर्वात मोठा विजय
अफगाणिस्तानच्या संघानं दिलेल्या २९४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २७.१ षटकात अवघ्या ९३ धावांवरच आटोपला. यासह अफगाणिस्तानच्या संघाने २०० धावांनी विजय नोंदवत दक्षिण आफ्रिकेचा मोठा विक्रम मोडीत काढला. ४ ऑक्टोबर २०१४ रोजी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अबू धाबीच्या मैदानात नेदरलँड्स संघाला १७४ धावांनी पराभूत केले होते. आता अफगाणिस्तान या मैदानातील सर्वाधिक मोठा विजय मिळवणारा संघ ठरला आहे.