मुंबई- सध्या देशात आयपीएल 2018चे वारे जोमाने वाहत आहेत, आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडाचाहत्यांमध्ये आहे. मात्र क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी यंदाचा हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण पहिल्यांदाच क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी येत्या 27 मे रोजी होणा-या VIVO IPLच्या अंतिम सामन्याद्वारे मराठी माणसांना मिळणार आहे.
VIVO IPL च्या अंतिम सामन्याच्या या खास कार्यक्रमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी सहभागी होणार आहे. मराठी भाषा आणि क्रिकेट या दोन्हीची प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा आहे. आयपीएल 2018च्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही गोष्टी एकत्र येणार असल्याने त्याचा भाग होण्यासाठी मी प्रचंड उत्सुक असल्याचे स्वप्नील जोशी सांगतो. 27 मे रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येणार असल्यामुळे या दुर्मीळ संधीचा प्रेक्षकांनी पुरेपूर आस्वाद घ्या.