Join us  

वाह रे पठ्ठ्या; पाकच्या अबीद अलीची तुफान फटकेबाजी; आशियाई फलंदाजांत ठरला 'दादा'!

पाकिस्तानच्या अबीद अलीनं वन डे आणि कसोटी क्रिकेट पदार्पणात शतक झळकावणाऱ्या पहिल्या पुरुष क्रिकेटपटूचा मान पटकावताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 5:51 PM

Open in App

पाकिस्तानच्या अबीद अलीनं वन डे आणि कसोटी क्रिकेट पदार्पणात शतक झळकावणाऱ्या पहिल्या पुरुष क्रिकेटपटूचा मान पटकावताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही शतकी खेळी करताना रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली. त्याचा हा झंझावात 174 धावांवर रोखण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आले, परंतु तोपर्यंत अबीदनं आशियात आतापर्यंत कोणालाच न जमलेला पराक्रम करून टाकला. त्यानं भारताच्या करूण नायर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावरही 'दादा'गिरी केली.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. कराची येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पाकिस्तानचा पहिला डाव 191 धावांत गुंडाळून श्रीलंकेनं 271 धावा केल्या. पण, पाकिस्ताननं दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. शान मसूद आणि अबीद अली यांनी पहिल्या विकेटसाठी 60 षटकांपर्यंत 246 धावांची भागीदारी केली. मसूद आणि अबीद या दोघांनीही शतकी खेळी केली, परंतु अबीदचे शतक पराक्रमी ठरले. कारकिर्दीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत शतक झळकावणारा तो पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला. 

जगात असा विक्रम करणारा तो नववा फलंदाज ठरला. यापूर्वी न्यूझीलंडच्या जिमी निशॅम ( 2014), भारताच्या रोहित शर्मा ( 2013), सौरव गांगुली ( 1996), ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग ब्लेवेट ( 1995), भारताच्या मोहम्मद अझरुद्दीन ( 1984), वेस्ट इंडिज अलव्हीन कालिचरण ( 1972), ऑस्ट्रेलियाच्या डॉज वॉल्टर्स (1965) आणि बिल पोनस्फोर्ड ( 1924) यांनी हा पराक्रम केला आहे. शान मसूद 198 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकार खेचून 135 धावा केल्या. 

अबीद आणि शान यांनी पहिल्या विकेटसाठी 278 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी केलेली ही दुसरी सर्वोत्तम बागीदारी ठरली. श्रीलंकेविरुद्धची ही पाकिस्ताच्या फलंदाजांची सर्वोतमत भागीदारी ठरली. पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी कसोटीच्या एकाच डावात शतक झळकावण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1997 मध्ये आमीर सोहैल ( 160 आणि इजाझ अहमद ( 151) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आणि सईद अन्वर ( 101) आणि तौफीक उमर ( 104) यांनी बांगलादेशिवरुद्ध ही कामगिरी केली आहे. 

अबीदनं 281 चेंडूंत 21 चौकार व 1 षटकार खेचून 174 धावा करत आणखी एक विक्रम नावावर केला. कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या तीन डावांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अबीदनं नावावर केला. अबीदनं पहिल्या तीन डावांमध्ये  321 धावा केल्या आणि आशियात अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांत त्यानं अव्वल स्थान पटकावले आहे.  या विक्रमात टीप फोस्टर ( 355) आणि लॉरेन्स रोवे ( 336) हे आघाडीवर आहेत. अबीदनं भारताच्या करुण नायर ( 320) आणि सौरव गांगुली ( 315) यांचा विक्रम मोडला. पाकिस्तानचे जावेद मियादाँद ( 318) या विक्रमात पाचव्या स्थानावर आहेत.

टॅग्स :पाकिस्तानसौरभ गांगुलीश्रीलंका