IPL 2025 LSG vs SRH Fight between Digvesh Rathi and Abhishek Sharma नवी दिल्ली - लखनऊ सुपर जायंट्स(LSG) चा गोलंदाज दिग्वेश राठी त्याच्या वर्तवणुकीमुळे चांगलाच गोत्यात आला आहे. आयपीएल २०२५ मध्ये दिग्वेश सिंह राठी त्याच्या सेलिब्रेशन स्टाईलमुळे वादात सापडला आणि बऱ्याचदा त्याच्यावर दंडही लावला गेला तरीही तो सुधारण्याचं नाव नाही. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडिअमवर १९ मे रोजी झालेल्या सामन्यावेळी दिग्वेशने जे कृत्य केले त्यामुळे मैदानावरच खेळाडू भिडण्याची वेळ आली.
काय घडलं?
लखनौनं सेट केलेल्या २०० प्लस धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मानं दमदार फटकेबाजीचा नजराणा दाखवून देत अर्धशतक झळकावले. तो सामना जिंकून देण्याच्या घाईत दिसत असताना दिग्वेश राठीनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. त्यानंतर दोघांच्यात वादावादी पाहायला मिळाली. दिग्वेशने सनराईजर्स हैदराबादचा सलामी फलंदाज अभिषेक शर्माला आऊट केल्यानंतर आक्रमक शैलीत विकेटचा जल्लोष केला. ते अभिषेक शर्माला बिल्कुल आवडले नाही. दिग्वेशच्या डिवचण्यामुळे अभिषेक आणि त्याच्यात मैदानातच वाद झाला. या दोघांमधील वाद पाहता अंपायर्सला मध्यस्थी करावी लागली. आता या कृत्यामुळे दोन्ही खेळाडूंना मोठी शिक्षा मिळाली आहे.
LSG चा गोलंदाज दिग्वेश राठी याच्यावर या सीजनमध्ये बऱ्याचदा दंड आकारूनही त्याच्या वागणुकीत बदल झाला नाही. आता पुन्हा एकदा त्याच्यावर मोठा आर्थिक दंड लावण्यात आला आहे. सनराइजर्स हैदराबादविरोधात मॅचमध्ये दिग्वेश सिंह राठीला अभिषेक शर्माशी भिडल्यामुळे कठोर शिक्षा मिळाली आहे. दिग्वेशवर आयपीएल कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या मॅचच्या फीवर ५० टक्के दंड लावला आहे. त्याशिवाय त्याला १ सामना बंदी आणली आहे. दिग्वेशवर वारंवार एका चुकीची पुनरावृत्ती केल्याने एका मॅचची बंदी आणली आहे. त्यामुळे येत्या २२ मे रोजी गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात लखनौ सुपर जायटंसकडून दिग्वेश खेळू शकणार नाही.
दुसरीकडे सनराइजर्स हैदराबादचा ऑलराऊंडर अभिषेक शर्मावरही IPL कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्याप्रकरणी मॅच फीमध्ये २५ टक्के दंड आकारला आहे. या सीजनमध्ये अनुच्छेद २.६ अंतर्गत हा त्याचा पहिला गुन्हा असल्याने त्याला एक डिमेरिट पाँईट मिळाला आहे. कोड ऑफ कंडक्टचा लेवल १ उल्लंघन केल्यास मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.