India vs Australia 4th Match Abhishek Sharma Chance To Equalling Virat Kohli All Time Record : भारतीय टी-२० संघातील युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा हा सातत्याने धमाकेदार कामगिरीसह अनेक विक्रम प्रस्थापित करत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात या पठ्ठ्याला किंग विराट कोहलीचा मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची शेवटची संधी आहे. जाणून घेऊयात अभिषेक शर्माला खुणावणाऱ्या 'विराट' विक्रमासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
छोट्या फॉरमॅटमध्ये मोठा डाव साधण्याची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा टी-२० सामना गुरुवारी ६ नोव्हेंबर, २०२५ रोजी क्विन्सलँड येथील कॅरारा ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघातील मालिका १-१ अशी बरोबरीत असून हा सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेवरील दावेदारी पक्की करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असतील. या सामन्यात छोट्याखानी खेळीसह तो विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो.
क्रिकेटच्या रणांगणात अधिराज्य गाजवणारा ‘किंग’! कोहलीनं सेट केलेले ५ 'विराट' विक्रम मोडणं अशक्यच
किंग कोहलीच्या नावे आहे टी-२० मध्ये सर्वात जलदगतीने १००० धावा करण्याचा विक्रम
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या किंग कोहलीनं आपल्या टी-२० कारकिर्दीतही अनेकदा अविस्मरणीय खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वात जलदगतीने १००० धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. कोहलीनं २७ डावात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या. अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी फक्त ३९ धावा करायच्या आहेत.
तो 'विराट' विक्रमी टप्पा गाठणार का?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मालिकेतील आतापर्यंत अभिषेक शर्मानं १६७.१६ च्या स्ट्राइक रेटनं ११२ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मानं आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत २६ डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९६१ धावा केल्या आहेत. चौथ्या सामन्यात ३९ धावा करत त्याला कोहलीप्रमाणे २७ व्या डावात हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. सातत्यपूर्ण कामगिरीसह अभिषेक शर्मा संघाला दमदार सुरुवात करून देताना पाहायला मिळाले आहे. तोच सिलसिला कायम राखत तो 'विराट' विक्रमी टप्पा गाठणार का? ते पाहण्याजोगे असेल.