लंडनः दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने ट्वेंटी-20 ब्लास्ट लीगच्या पदार्पणाच्या सामन्यात धुमाकूळ घातला. त्यानं मिडलसेक्स क्लबकडून खेळताना पहिल्याच सामन्यात 43 चेंडूंत 88 धावा चोपल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. मिडलसेक्स आणि एस्सेक्स या क्लबमध्ये ट्वेंटी-20 ब्लास्ट लीगचा पहिला सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात आला. ज्यात मिडलसेक्स संघाने 165 धावांचे लक्ष्य 7 विकेट राखून सहज पार केले.
एस्सेक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात मिडलसेक्स संघाचे दोन फलंदाज 5.2 षटकांत 39 धावा करून माघारी परतले होते. त्यानंतर एबीनं एकहाती सामना फिरवला. त्यानं सलामीवीर डेविड मलानसह 105 धावांची भागीदारी केली. मलानने 43 धावा केल्या. एबीनं त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 43 चेंडूंत 88 धावा कुटल्या. त्यानं जवळपास 204.65 च्या स्ट्राईक रेटनं एस्सेक्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. मिडलसेक्स संघानं तीन षटकं राखून हा सामना जिंकला.