ॲरॉन जॉर्जने झळकावलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानवर सात गडी आणि ५३ चेंडू राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धा इतिहासात भारतीय संघाने विक्रमी दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अफगाणिस्तानने ५० षटकांत ४ बाद ३१० धावा केल्या. यानंतर, भारताने ४१.१ षटकांत ३ बाद ३११ धावा करत संस्मरणीय विजय मिळवला. १०४ चेंडूंत १५ चौकार आणि दोन षटकारांसह ११५ धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा ॲरॉन सामनावीर ठरला. भारतीयांना विक्रमी सहावे विश्वविजेतेपद उंचावण्यासाठी शुक्रवारी इंग्लंडच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. विजयासाठी ३११ धावांच्या आव्हानासमोर ॲरॉन आणि वैभव सूर्यवंशी यांनी ९० धावांची सलामी देत भारताला दमदार सुरुवात करून दिली. ओमरझाईने सूर्यवंशीला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३३ चेंडूंत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ६८ धावा केल्या. त्यानंतर जाॅर्जने आयुष म्हात्रेसोबत दुसऱ्या गड्यासाठी ११४ धावा जोडत संघाला द्विशतकी मजल मारून दिली. ओमरझाईने म्हात्रेला बाद करत ही भागीदारीही संपुष्टात आणली. म्हात्रेने ५९ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह ६२ धावा केल्या. त्यानंतर जाॅर्जने विहान मल्होत्रासोबत ९६ धावांची भागीदारी करताना संघाला त्रिशतकी मजल मारून दिली.
विजयाच्या जवळ असताना जॉर्जला वहिदुल्लाह झादरानने बाद केले. त्यानंतर विहानने (नाबाद ३९) वेदांत त्रिवेदीसोबत (नाबाद ४) संघाचा विजय साकारला. अफगाणिस्तानकडून नूरिस्तानी ओमरझाईने दोन बळी घेतले. भारतासाठी या विजयात महत्त्वाची बाब ठरली ती कर्णधार आयुष म्हात्रेने मिळवलेला फॉर्म. त्याने मोक्याच्यावेळी शानदार कामगिरी केली.
अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. उस्मान सादात (३९) आणि खालीद अहमदझाई (३१) यांनी ५३ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. खालीदला बाद करत दीपेशने ही जोड फोडली. उस्मान सादातने फैसल शिनोजादा याच्यासोबत ६४ धावा जोडत संघाला शतकी मजल मारून दिली.
कनिष्क चौहानने उस्मानला बाद केले. फैसल शिनोजादा आणि उझैरुल्लाह नियाझाई यांनी दमदार फलंदाजी करताना तिसऱ्या गड्यासाठी १३० चेंडूंत १४८ धावा जोडल्या. फैसलने ९३ चेंडूंत १५ चौकारांसह ११० धावा केल्या. दीपेशने त्याचा त्रिफळा उडवला, तर उझैरुल्लाहने ८६ चेंडूंत १२ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. अजीजुल्ला मियाखिल (१२) आणि अब्दुल अझीझ (नाबाद ७) यांनी संघाला त्रिशतकी मजल मारून दिली.
भारताकडून दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विश्वविक्रम नोंदवला. भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सलग सहाव्यांदा अंतिम फेरी गाठली.
Web Summary : India U19 stormed into the World Cup final, defeating Afghanistan. Aaron George's century powered India's chase of 311. India faces England for the title, aiming for a record sixth victory. India broke the record for the highest successful run chase in U19 World Cup history.
Web Summary : भारत अंडर-19 ने अफगानिस्तान को हराकर वर्ल्ड कप फाइनल में जगह बनाई। एaron जॉर्ज के शतक ने 311 रनों का पीछा करने में मदद की। भारत का मुकाबला इंग्लैंड से होगा, जिसका लक्ष्य रिकॉर्ड छठा खिताब जीतना है। भारत ने अंडर-19 वर्ल्ड कप इतिहास में सबसे बड़ा रन चेज का रिकॉर्ड तोड़ा।