Join us  

‘आला रे आला अजिंक्य आला', रहाणेचे जंगी स्वागत; ऑस्ट्रेलियाला नमविणाऱ्या विजेत्या भारतीय संघाचे मायदेशात आगमन

रहाणे, रोहित शर्मा, कोच रवी शास्त्री, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबईत दाखल होताच एमसीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. संघाच्या विजयाचा जल्लोष म्हणून रहाणेने केकदेखील कापला. रहाणे स्वत:च्या माटुंगास्थित निवासस्थानी दाखल झाला, त्यावेळी पारंपरिक ढोल-ताशांचा गजर झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 3:22 AM

Open in App

मुंबई/ नवी दिल्ली : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ३२ वर्षांपासून अजिंक्य असलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या युवा ब्रिगेडने धूळ चारली. अजिंक्यसह विजेत्या संघातील खेळाडूंचे मायदेशात आगमन होताच सर्वांचे जंगी स्वागत करण्यात आले. अजिंक्य मुंबईत दाखल होताच ढोल-ताशांचा गजर आणि रेड कार्पेट अशा थाटात त्याचे सर्वांनी स्वागत केले.‘आला रे आला अजिंक्य आला', ‘आला रे आला अजिंक्य आला' अशा गगनभेदी घोषणाही यावेळी ऐकायला मिळाल्या.रहाणे, रोहित शर्मा, कोच रवी शास्त्री, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबईत दाखल होताच एमसीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. संघाच्या विजयाचा जल्लोष म्हणून रहाणेने केकदेखील कापला. रहाणे स्वत:च्या माटुंगास्थित निवासस्थानी दाखल झाला, त्यावेळी पारंपरिक ढोल-ताशांचा गजर झाला. शिवाय ‘आला रे आला अजिंक्य आला’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी रेडकार्पेट टाकून पुष्पवृष्टी करण्यात आली. चाहत्यांचे प्रेम पाहून अजिंक्य फार भावुक झाला होता. कोरोनामुळे अनेक चाहते मास्क घालून विमानतळावर आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आले होते.

त्याआधी, ब्रिस्बेन कसोटी विजयाचा नायक ऋषभ पंत पहाटे दिल्लीत दाखल झाला, तर नेट गोलंदाज म्हणून संघासोबत गेलेला पण नंतर तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू बनलेला टी. नटराजन बेंगळुरुकडे रवाना झाला. तेथून तो तमिळनाडूतील आपले गाव सालेमकडे रवाना होईल. चेन्नईत वास्तव्य असलेला अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि गोलंदाजी कोच भरत अरुण दुबईत असून, सर्वजण आज, शुक्रवारी पहाटे पोहोचतील....आणि पालघरमध्येही झाला जबरदस्त जल्लोष!पालघर - शार्दुल ठाकूर गुरुवारी आपल्या घरी माहीम (केळवा) येथे पोहोचला. मित्रांनी फटाके वाजवून त्याचे जोरदार स्वागत केल्यानंतर आईने औक्षण करून शार्दुलला पेढा भरवला. पालघरचे नाव उंचावलेल्या शार्दुलचे जंगी स्वागत करण्याच्या स्थानिकांच्या मनसुब्यावर कोरोना प्रादुर्भावाने पाणी फेरले. शार्दुलचे सातत्य कायम टिकण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात, असे वडील नरेंद्र व आई हंसा यांनी सांगितले.  घरी पोहोचताच शार्दुल क्वारंटाईन झाला.
पवारांमुळे मिळाला दिलासा, पहिली कसोटी खेळू शकणार -मुंबईत येण्याआधी खेळाडूंसमोर शासकीय नियम उभा राहिला. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवता येणार की नाही, या विचारात असलेल्या खेळाडूंसाठी आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावला. कोरोनामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्याचा नियम आहे. यामुळे मुंबईचे खेळाडू व प्रशिक्षक रवी शास्त्री किमान १४ दिवस घरी जाऊ शकणार नव्हते. असे झाले असते, तर इंग्लंडविरुद्ध ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीस हे खेळाडू मुकले असते. खेळाडूंचा वेळ विलगीकरणात जाणार नाही यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून खेळाडूंना सूट देण्याबद्दल चर्चा केली. विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करून खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्याचप्रमाणे, कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर, सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ व प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पुढील सात दिवस घरीच विलगीकरणात वास्तव्य करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ही माहिती दिली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतअजिंक्य रहाणेरोहित शर्माशार्दुल ठाकूर