Join us

डब्ल्यूटीसी फायनलवर नजर; तिसरी कसोटी आजपासून

भारताविरुद्ध माघारलेला ऑस्ट्रेलिया मुसंडी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 05:40 IST

Open in App

इंदूर :  भारतीय संघ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीत बुधवारी होळकर मैदानावर उतरेल तेव्हा घरच्या मैदानावर सलग १६ व्या मालिका विजयासह विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात धडक देण्याचे संघाचे प्रयत्न असणार आहेत.

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया चार सामन्यांच्या मालिकेत मुसंडी मारण्याच्या इराद्याने खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने पाच दिवसांच्या खेळात जिंकून बॉर्डर- गावसकर ट्रॉफीवर ताबा मिळविला. या सामन्यात मात्र संघ निवड ही डोकेदुखी असेल.  लोकेश राहुल की शुभमन गिल ही उत्सुकता आहे. राहुल सध्या उपकर्णधार नसला तरी व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवीत असल्याने लय मिळविण्याची आणखी एक संधी त्याच्याकडे असेल. 

फिरकीपटूंचे वर्चस्व असलेल्या या मालिकेत एकमेव शतक ठोकले ते रोहित शर्मा याने. येथे प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यास त्याच्यासह चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली  यांनादेखील धावा काढण्याची संधी मिळेल. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटाने गडी बाद करण्यासह शानदार धावाही काढल्या आहेत.

आता ही जबाबदारी आघाडीच्या फळीने स्वीकारण्याची गरज आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांना स्वीपचे फटके मारणे आत्मघातकी ठरल्यामुळे ऑस्ट्रेलिया आता पारंपरिक फटकेबाजीवर भर देणार आहे. दुसरीकडे भारतीय फलंदाजांनी प्रतिस्पर्धी फिरकीला यशस्वीपणे तोंड दिले. होळकर मैदानाच्या खेळपट्टीवर लाल आणि काळ्या मातीचे मिश्रण आहे. येथे चेंडू कमी वळण घेईल शिवाय उसळी कमी असेल, अशी अपेक्षा आहे. अशा वेळी ऑस्ट्रेलिया संघात अनेक बदल शक्य आहेत. पॅट कमिन्स, एश्टन एगर, जोश हेजलवूड आणि डेव्हिड वॉर्नर मायदेशी परतले. संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडे असेल. वॉर्नरच्या अनुपस्थितीत उस्मान ख्वाजासोबत ट्रॅव्हिस हेड सलामीला येईल. पाहुण्या संघाची फलंदाजी स्मिथ आणि लाबुशेन यांच्यावर विसंबून असली तरी दोघेही या मालिकेत धावा काढण्यात अपयशी ठरले. मिचेल स्टार्कसोबतच कॅमेरून ग्रीन फिट आहे. दोघांनाही अंतिम एकादशमध्ये स्थान मिळण्याची आशा आहे. याशिवाय  नाथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमॅन या तज्ज्ञ फिरकीपटूंसह  ऑस्ट्रेलिया मैदानावर उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App