आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारतासाठी फायदेशीर ठरली आहे. मालिका जिंकण्यासोबतच भारताने काही चिंताही दूर केल्या आहेत, मालिकेपूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म ही सर्वांत मोठी चिंतेची बाब होती. यामुळे विश्वचषकातील त्याच्या कामगिरीवर नक्कीच परिणाम झाला असता, एक तर खराब फॉर्म आणि त्यातच कर्णधारपदाचे दडपण, जर सूर्यकुमार फॉर्ममध्ये परतला नसता, तर विश्वचषकात त्याच्यासाठी परिस्थिती खूप कठीण झाली असती. यामुळे संपूर्ण संघ दडपणाखाली येऊन विस्कळीत होण्याची शक्यता होती. परंतु, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सूर्याने फॉर्ममध्ये पुनरागमन केले आणि भारताने सुटकेचा निःश्वास सोडला.
ईशानचे दमदार प्रदर्शन
भारतासाठी दुसरी सकारात्मक गोष्ट म्हणजे फलंदाज ईशान किशनचे संघात पुनरागमन, जवळपास दोन वर्षांनंतर त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना पाहिले. ईशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्याच्या जोरावर त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. तरीही, ईशान किशनला अजूनही सातत्याची गरज आहे. विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये त्याला आपल्या कामगिरीत नक्कीच सातत्य दाखवावे लागेल.
अष्टपैलू शिवम दुबे विश्वासास पात्र ठरला
अष्टपैलू शिवम दुबेने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात विशाखापट्टणम येथे ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती गोलंदाजांमध्ये धडकी भरवणारी आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने ही भारतासाठी मोठी उपलब्धी मानली जाईल. दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे, जो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि मध्यमगती वेगवान गोलंदाजीही करू शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी विश्वास दाखवून दुबेकडून गोलंदाजीही करवून घेतली.
राणाने स्वतःला सिद्ध केले
सूर्यकुमार आणि गंभीर यांनी हर्षित राणाचाही उत्तम वापर केला. त्याला अंतिम अकरामध्ये समाविष्ट करण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. राणानेही चेंडूसोबतच बॅटनेही उत्कृष्ट कामगिरी करून टीकाकारांची तोंडे बंद केली, विशेषतः तळाच्या क्रमांकावर त्याची बॅट तळपली आहे. अर्थातच, त्याच्यात हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेलसारख्या अष्टपैलू गुणवत्तेची कमतरता असेल; पण तो एक उपयुक्त खेळाडू आहे, हे विसरून चालणार नाही.
आत्मसंतुष्ट राहणे टाळा
टी-२० विश्वचषकात भारतासाठी लीग फेरी सोपी असेल; पण बाद फेरीत आव्हाने खूप आहेत. कारण, भारताला आपल्याच भूमीवर खेळायचे आहे आणि देशातील क्रिकेटप्रेर्मीच्या अपेक्षा भारतीय संघावर दबाव निर्माण करतील. असे असूनही, विद्यमान विजेता संघ जेतेपद राखण्यास समर्थ आहे. परंतु, एक-दोन विजयांनंतर संघाने आत्मसंतुष्ट राहणे टाळावे लागेल.
सॅमसनची निराशाजनक कामगिरी कायम
भारतासाठी अजूनही संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. या यष्टिरक्षक सलामीवीराची बॅट न्यूझीलंडविरुद्ध चालली नाही. ईशान किशनही यष्टिरक्षण करतो आणि त्याच्या शानदार कामगिरीमुळे आता सॅमसनवर दबाव वाढला आहे.