- अनन्या भारद्वाज
(मुक्त पत्रकार)
अरुणाचल आणि मेघालय यांच्यातला रणजी सामना. तोही कुठे तर देशाच्या पश्चिमेला. थेट सुरतला. एकही नामांकित खेळाडू मैदानात नसताना कोण कशाला तो सामना पाहायला जातोय? तसंही ईशान्य भारतीय इवल्याशा राज्यांत काय दर्जाचे क्रिकेटपटू असणार? लिंबूटिंबू संघांची मॅच असाच एकूण सूर.. पण रविवारी काहीतरी भलतंच घडलं. आठव्या क्रमांकावर येतो एक खेळाडू, खरंतर बॉलरच. तो मैदानात येतो, त्याचा कोच त्याला सांगतो, जा-जा, कर अटॅक कर ! तोही प्रशिक्षकाचं ऐकतो. पहिला बॉल कसाबसा टोलावतो.. आणि पुढच्या सलग आठ चेंडूंवर तो षटकार खेचतो. ११ चेंडूत ५० धावा ! विश्वविक्रम ! मैदानात आल्यापासून केवळ नऊ मिनिटांत त्याचं अर्धशतक बोर्डावर झळकलं. त्या खेळाडूचं नाव आकाश कुमार चौधरी.
मेघालयाकडून खेळणारा हा २५ वर्षांचा मुलगा. २०१९ पासून तो प्रथम दर्जा क्रिकेट खेळतो आहे. त्यानं पदार्पण केलं ते आधी नागालॅण्ड संघाकडून. मग त्याला मेघालय संघात स्थान मिळालं. त्याची सारी भिस्त बॉलिंगवर. बॅटिंग तर तो आवडते म्हणून, संधी मिळाली तर करतो. पण त्यादिवशी नशीब जोरावर होतं आणि त्याला प्रथम दर्जा क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचं बक्षीस देऊन गेलं. प्रथम दर्जा क्रिकेटमध्ये सलग ८ षटकार मारणारा पहिला खेळाडू अशीही नोंद त्याच्या नावावर झाली.
देशातल्याच काय जगभरातल्या माध्यमांत तो झळकला. रेकॉर्डचा चमत्कार दाखविल्यावर तो व्हायरलच्या लाटेवरही स्वार झाला. अन्यथा मेघालयातल्या कोपऱ्यात खेळणारा हा खेळाडू एरव्ही कुणाला कळला असता? अर्थात निखळ कौतुक त्याच्याही वाट्याला आलेलं नाहीच, लोक म्हणतच आहेत की अरुणाचल संघाची बॉलिंगच इतकी जेमतेम की इतरांचे रेकॉर्ड व्हावेत म्हणून तर ते खेळतात. पण खेळात जर तरला अर्थ नसतो.
वेल्डिंगची कामं करणारे वडील, आई शिवणकाम करते आणि क्रिकेटच्या ग्लॅमरपासून फार लांब असलेलं पहाडी जग. त्या जगात हा मुलगा मोठं स्वप्न पाहतो आहे.. क्रिकेटने त्याला ओळख दिली, पण मोठी संधी देईल का..? ते पुढचं पुढे..