आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारताच्या १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर युवा कसोटी मालिकेत २-० असे क्लीन स्वीप देत इतिहास रचला आहे. या विजयाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे मालिकेतील दुसरी कसोटी! ही कसोटी फक्त ८८६ चेंडू (सुमारे दोन दिवस) चालली आणि भारताने ती जिंकून ३० वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला.
भारताच्या युवा गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्णपणे हतबल झाले. टीम इंडियाने दुसरी युवा कसोटी अवघ्या दोन दिवसांत ७ विकेट्सने जिंकून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. दरम्यान, १९९५ मध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानला फैसलाबादमध्ये ९९२ चेंडूत पराभूत केले होते. भारताने आता हा सामना केवळ ८८६ चेंडूत जिंकून सर्वात कमी चेंडूत युवा कसोटी सामना जिंकण्याचा मान मिळवला आहे.
या ऐतिहासिक विजयात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट फॉर्म दाखवला. वैभवची फलंदाजी, कर्णधार आयुष म्हात्रेची प्रभावी रणनीती आणि गोलंदाजांचा धारदार मारा यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मालिकेत कुठेही पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही
भारताचे'डबल क्लीन स्वीप'
भारताच्या १९ वर्षांखालील संघाने या दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघावर कसोटीसह एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपले वर्चस्व सिद्ध केले. युवा एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. विशेष म्हणजे, भारताने भारताने तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकले. त्यानंतर युवा कसोटी मालिकेतही ऑस्ट्रेलियाचा २-० ने धुव्वा उडवला.