६७ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली; जम्मू-काश्मीर रणजी ‘चॅम्पियन’

सांघिक कामगिरीच्या जोरावर तारांकित खेळाडूंच्या बलाढ्य कर्नाटक संघाला चारली धूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 04:48 IST2026-03-01T04:48:11+5:302026-03-01T04:48:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
67 years of wait finally over; Jammu and Kashmir Ranji 'champions' | ६७ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली; जम्मू-काश्मीर रणजी ‘चॅम्पियन’

६७ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली; जम्मू-काश्मीर रणजी ‘चॅम्पियन’

हुबळी : जम्मू-काश्मीरने आपल्या जोश आणि जिद्दीचे शानदार प्रदर्शन करत शनिवारी कर्नाटकविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या अंतिम सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पहिल्यांदाच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयासह त्यांनी आपली ६७ वर्षांची आणि तब्बल २४१५२ दिवसांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. 

आठ वेळच्या विजेत्या कर्नाटक संघाविरुद्ध जम्मू-काश्मीरने हा दणदणीत विजय नोंदविला. पाच दिवस चाललेल्या या लढतीत त्यांनी सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखत या हंगामाचा अतिशय दिमाखदार शेवट केला. जम्मू-काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभारला होता. याला प्रत्युत्तर देताना कर्नाटकचा डाव अवघ्या २९३ धावांवर आटोपला. अशा प्रकारे जम्मू-काश्मीरला २९१ धावांची भक्कम आघाडी मिळाली. मात्र, कर्नाटकला ‘फॉलोऑन’ देण्याऐवजी त्यांनी दुसरा डाव खेळण्याचा निर्णय घेतला.
अंतिम दिवशी जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात ४ बाद ३४२ धावा केल्या असताना दोन्ही संघांच्या कर्णधारांनी सामना अनिर्णीत ठेवण्यावर सहमती दर्शवली. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच चॅम्पियन ठरला. त्यांची एकूण आघाडी तब्बल ६३३ धावांची झाली होती. सकाळी जम्मू-काश्मीरने ४ बाद १८६ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. कामरान इकबाल आणि साहिल लोतरा यांनी  नाबाद शतके झळकावली. सामना अनिर्णीत ठेवण्याचा निर्णय झाला तेव्हा, कामरान १६० धावांवर, तर साहिल  १०१ धावांवर नाबाद होता. लोतराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले.

धावफलक

जम्मू-काश्मीर (पहिला डाव) :१७३.१ षटकांत सर्वबाद ५८४ धावा.  कर्नाटक (पहिला डाव) : ९३.३ षटकांत सर्वबाद २९३ धावा.  जम्मू-काश्मीर (दुसरा डाव) : कामरान इकबाल नाबाद १६०, यावर हसन त्रि. गो. कृष्णा १, शुभम पुंडिर झे. श्रीजीत गो. विषक ४, पारस डोगरा त्रि. गो. कृष्णा १६, अब्दुल समद झे. विषक गो. गोपाल ३२, साहिल लोतरा नाबाद १०१. अवांतर-२८, एकूण ११३ षटकांत ४ बाद ३४२ धावा.  बाद क्रम : १-६, २-११, ३-७२, ४-१४५. गोलंदाजी : विजयकुमर विषक १०-१-३०-१, प्रसिद्ध कृष्णा १२-०-४२-२, विद्याधर पाटील १३-०-५१-०, शिखर शेट्टी ३१-१०-५०-०, श्रेयस गोपाल ३६-१३-८४-१, करुण नायर ७-२-२१-०, लोकेश राहुल २-०-१५-०, मयंक अग्रवाल २-०-२३-०.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून संघासाठी दोन कोटींची घोषणा

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक रणजी करंडक विजयाबद्दल खेळाडू आणि सहयोगी कर्मचाऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांच्या रोख पारितोषिकाची घोषणा केली आहे. रोख बक्षिसासोबतच खेळाडूंच्या भविष्याची तरतूद करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले की, “नुकत्याच अधिसूचित करण्यात आलेल्या नव्या सरकारी नियमांनुसार या विजेत्या खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांचा लाभही दिला जाईल.”

एक प्रेरणादायी प्रवास
रणजी करंडकाचा इतिहास ९२ वर्षांचा आहे. जम्मू-काश्मीरच्या संघाने ६७ वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. कमकुवत मानल्या जाणाऱ्या या संघाने कौशल्याच्या जोरावर स्वतःला बलाढ्य सिद्ध केले. २०१३-१४, २०१९-२०, २०२४-२५ च्या हंगामात त्यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यापुढे मजल मारण्यात अपयश आले. पण, केएससीए स्टेडियमवर गेल्या पाच दिवसांत कधीही असे वाटले नाही की, त्यांचे खेळाडू पहिल्यांदाच रणजी करंडकाचा अंतिम सामना खेळत आहेत. 

Web Title : जम्मू-कश्मीर ने 67 साल बाद रणजी ट्रॉफी जीती

Web Summary : जम्मू-कश्मीर ने 67 साल के इंतजार के बाद कर्नाटक को हराकर पहली बार रणजी ट्रॉफी जीती। टीम ने पहली पारी में मजबूत बढ़त हासिल की। मुख्यमंत्री ने टीम के लिए ₹2 करोड़ के पुरस्कार की घोषणा की।

Web Title : Jammu & Kashmir Wins Ranji Trophy After 67-Year Wait

Web Summary : Jammu & Kashmir clinched their first Ranji Trophy title, defeating Karnataka after a 67-year wait. The team dominated with a strong first innings lead. The Chief Minister announced ₹2 crore reward for the team.