नवी दिल्ली : बीसीसीआयने मार्च २०२८ पर्यंत पाच वर्षांसाठी भारतातील ८८ स्थानिक सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार विकून एक अब्ज डॉलरची (८ हजार २०० कोटी रुपये) कमाई करण्याचे लक्ष्य आखले आहे. लिलाव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असून लिलावाची पद्धत आयपीएलसारखीच राहणार असून ई- लिलावाद्वारे प्रक्रिया पार पाडली जाईल.
मागच्या सत्रात एका सामन्याची कमाई ६० कोटी!
मागच्या पाच वर्षांत (२०१८-२०२३) बीसीसीआयने ९४.४० कोटी डॉलर (जवळपास ६१३८ कोटी रुपये) स्टार इंडियाकडून मिळविले होते. त्यामुळे प्रति सामना ६० कोटींची (डिजिटल आणि टीव्ही) कमाई झाली. यावेळी मात्र डिजिटल आणि टीव्ही अधिकारांसाठी वेगवेगळी निविदा मागविली जाईल. आयपीएलदरम्यान मीडिया अधिकारातून बोर्डाला ४८.३९० कोटींची कमाई झाली होती. याचे डिजिटल अधिकार रिलायन्स आणि टीव्ही अधिकार स्टारने खरेदी केले होते.
आगामी दावेदार
डिझनी- स्टार, रिलायन्स वायकॉम
आगामी टप्प्यातील सामने
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ स्थानिक सामने (५ कसोटी, ६ वनडे आणि १० टी-२०)
इंग्लंडविरुद्ध १८ सामने (१० कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२०)
भारताला एकूण २५ कसोटी, २७ वनडे आणि ३६ टी-२० सामने खेळायचे आहेत.
प्रसारकांना काय वाटते!
पुढील पाच वर्षांत भारत २५ कसोटी सामने खेळेल. मागील पाच वर्षांत अनेक कसोटी सामने पाच दिवस खेळले गेले नाहीत. यातील बरेच सामने तीन दिवसांत संपले होते. ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे.
प्रसारण हक्काबाबतचा आकडा सांगणे कठीण आहे. मागच्या टप्प्याच्या तुलनेत डॉलर आणि रुपयाच्या दरात तफावत निर्माण झाली. डिजिटल अधिकारांसाठी टीव्ही अधिकारांच्या तुलनेत अधिक किंमत मिळू शकेल.
तीन महिन्यानंतर भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन होत आहे. भारत विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरल्यास जाहिरातींच्या उत्पन्नावर परिणाम होईल.