कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील मोलाकलमुरु तालुक्यातील मरियाम्मनहल्ली गावात विराट कोहलीच्या कटआउटसमोर बकऱ्याचा बळी दिल्याच्या आरोपाखाली कर्नाटक पोलिसांनी आरसीबीच्या तीन चाहत्यांना अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
सन्ना पलय्या (वय, २२), जयन्ना (वय, २३) आणि टिपे स्वामी (वय, २८) असे अटक करण्यात आलेल्या आरसीबीच्या चाहत्यांची नावे आहेत. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर आरोपींनी विराट कोहलीच्या कटआउटसमोर बकऱ्याचा बळी दिला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
व्हायरल होत असलेल्या २० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये विराट कोहलीच्या कटआउटसमोर तीन व्यक्ती बकऱ्यासोबत उभे असल्याचे दिसत आहे. त्यानंतर एक व्यक्ती आरसीबीच्या विजयाची घोषणा करतो आणि बकऱ्याची बळी देतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. प्राणीप्रेमींच्या आक्रोशानंतर मोलाकलमुरु पोलिसांनी तिघांना अटक केली.
आयपीएल फ्रँचायझी आरसीबीचे जगभरात चाहते आहेत. आरसीबीने आतापर्यंत एकदाही ट्रॉफी जिंकली नाही. यंदाच्या हंगामात आरसीबीचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आरसीबी आयपीएलचे विजेतेपद जिंकेल, असे चाहत्यांना वाटत आहे. आरसीबीने गेल्या सामन्यात घरच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केल्यानंतर चाहत्यांचा विश्वास आणखी वाढला आहे. उर्वरित सामन्यात आरसीबीचा संघ कशी कामगिरी बजावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.