Join us

आठ लाख तिकिटांसाठी आले ३ कोटी अर्ज!

भारत, इंग्लंडचे सामने सर्वात महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 04:15 IST

Open in App

मुंबई : क्रिकेटच्या महासंग्रामाला इंग्लंड आणि वेल्स येथे ३० मेपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड पाचव्यांदा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी त्यांनी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते, पण यंदाचा इंग्लंड संघाचा फॉर्म पाहता, हा विश्वचषक तेच उंचावणार असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ भारतीय संघाचा क्रमांक येतो. त्यामुळेच या दोन संघांच्या सामन्यांच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी आहे.

३० मे ते १४ जुलै या कालावधीत ४८ सामने होणार आहेत. या सामन्यांच्या एकूण ८ लाख तिकिटांसाठी १४८ देशांतून जवळपास ३ कोटी अर्ज आले आहेत. हे तिकीट मिळविण्यासाठी चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार असून, तिकिटांचा काळाबाजार होऊ नये, याकरिता आयसीसी करडी नजर ठेवून आहे. भारत आणि इंग्लंडच्या चाहत्यांना तिकिटांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. या स्पर्धेतील सर्वात स्वस्त तिकीट ४० डॉलर म्हणजेच ३,५०० रुपयांचे आहे, परंतु ही किंमत केवळ इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध भारत या सामन्यांसाठी आहे.

महत्त्वाच्या सामन्यांसाठी चाहत्यांना ५,००० ते ६,२०० रुपये मोजावे लागतील. सर्वाधिक तिकिटांची किंमत ही ९,००० पर्यंत आहे. आयसीसीने जवळपास ८० हजार तिकिटांची किंमत १,८०० किंवा त्यापेक्षा कमी आणि २ लाख तिकिटांची किंमत ४,५०० किंवा त्यापेक्षा कमी ठेवली आहे.

टॅग्स :भारत