Join us

Mithali Raj: 3-4 खेळाडू वरिष्ठ संघातून खेळतील, मितालीने व्यक्त केला विश्वास

Mithali Raj: भारताच्या युवा मुलींनी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकून सर्वांना प्रभावित केले. या संघातील खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ता आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 06:20 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘भारताच्या युवा मुलींनी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकून सर्वांना प्रभावित केले. या संघातील खेळाडूंमध्ये मोठी गुणवत्ता आहे. या संघातील किमान ३-४ खेळाडू भविष्यात भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवतील आणि २०२५ सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत मोलाची भूमिका निभावतील,’ असा विश्वास भारताची माजी दिग्गज कर्णधार मिताली राज हिने व्यक्त केला आहे. 

 लेग स्पिनर पार्श्वी चोप्रा, सलामीवीर श्वेता सेहरावत, वेगवान गोलंदाज तितास साधू, ऑफ स्पिनर अर्चना देवी आणि डावखुरी फिरकीपटू मन्नत कश्यप यांनी दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषक स्पर्धेत लक्षवेधी खेळ करत भारताच्या विश्वविजेतेपदामध्ये मोलाची भूमिका निभावली. आयसीसीच्या एका कार्यक्रमामध्ये मितालीने म्हटले की, ‘फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी खूप प्रभावित केले. वरिष्ठ स्तरावर दोन्ही विभागांमध्ये आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. जास्त पर्याय असणे कधीही चांगलेच ठरते. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेवर आणखी काम करावे लागेल. ते खूपच प्रभावी खेळाडू आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्यांना खेळावे लागेल.’

मिताली पुढे म्हणाली की, ‘पुढील एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक भारतात होणार आहे आणि वरिष्ठ स्तरावर आम्ही एकही विश्वचषक जिंकू शकलेलो नाहीत. बीसीसीआय या युवा खेळाडूंवर लक्ष ठेवेल, याची मला खात्री आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकापूर्वी कर्णधार शेफाली वर्मासोबत झालेल्या संवादामध्ये आम्ही तंत्राच्या बाबतीत काहीही चर्चा केली नव्हती. आम्ही तयारीबाबत बोललो होतो. या मुली खूप युवा आहेत. संघाच्या सरावात आणि वैयक्तिक सरावात खूप फरक असतो. याविषयीही आम्ही चर्चा केली. 

टॅग्स :मिताली राजभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App