Join us  

26 नोव्हेंबरचा महिमा; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या द्विशतकाचा योगायोग

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यासमोर नतमस्तक न झालेला असा कोणताच विक्रम नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:22 AM

Open in App
ठळक मुद्देसचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या द्विशतकांचा योगायोगनागपूरच्या स्टेडियमवर केला होता पराक्रम17 वर्षांनंतर कोहलीने जुळवून आणला योगायोग

मुंबई : भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यासमोर नतमस्तक न झालेला असा कोणताच विक्रम नाही. क्रिकेटचा देव असलेल्या तेंडुलकरने वीस वर्षांहून अधिक काळ मैदान गाजवले. तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये नव्या ताऱ्याचा शोध सुरू झाला आणि विराट कोहलीचा उदय झाला. कोहलीनेही आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम मोडले, बनवले... त्या विक्रमांत तेंडुलकरच्याही विक्रमांचा समावेश होता. त्यामुळे कोहलीची सतत तेंडुलकरशी तुलना होत राहिली आहे. या दोघांच्या अशाच एका खेळीचा योगायोग 26 नोव्हेंबरला जुळून आला आहे. 

26 नोव्हेंबर ही तारीख तेंडुलकर आणि कोहली यांच्या चाहत्यांना चांगलीच लक्षात असेल. याच तारखेने तेंडुलकर आणि कोहलीच्या कसोटीतील द्विशतकांचा योगायोग जुळवून आणला आहे. या योगायोग केवळ तारखेचाच नव्हे, तर स्टेडियमचाही आहे. तेंडुलकरने 26 नोव्हेंबर 2000 मध्ये नागपूर कसोटीत झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 201 धावा केल्या होत्या. याच नागपूरात 17 वर्षांनी 26 नोव्हेंबरलाच श्रीलंकेविरुद्ध 213 धावांची खेळी केली होता. तेंडुलकर आणि कोहली यांच्यातील हा योगायोग चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

भारताने 2000 मध्ये नागपूर कसोटीत प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेविरुद्ध पहिला डाव 6 बाद 609 धावांवर घोषित केला. शिवसुंदर दास (110) आणि राहुल द्रविड ( 162) यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 नोव्हेंबरला तेंडुलकरने नाबाद 201 धावांची खेळी केली. झिम्बाब्वेचा पहिला डाव 382 धावांवर कोसळल्यानंतर भारताने फॉलोऑन दिला. झिम्बाब्वेने 6 बाद 503 धावा करून हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले.

बरोबर 17 वर्षांनी नागपूरच्या स्टेडियमवर कोहलीने द्विशतक झळकावलं. श्रीलंकेविरुद्घच्या सामन्यात कोहलीने 213 धावांची खेळी साकारली. श्रीलंकेचा पहिला डाव 205 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने 6 बाद 610 धावांवर डाव घोषित केला. यात मुरली विजय ( 128), चेतेश्वर पुजारा ( 143) आणि रोहित शर्मा ( 102*) यांच्या शतकांचाही समावेश होता. कोहलीने 26 नोव्हेंबरला द्विशतक पूर्ण केले. भारताने हा सामना एक डाव व 239 धावांनी जिंकला होता.

टॅग्स :सचिन तेंडुलकरविराट कोहलीनागपूर