भारताचा युवा वेगवान गोलदांज मोहम्मद सिराज यांच्यानंतर आता १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य मदन लाल यांनाही विमान कंपनी इंडिगोच्या ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. मुंबईहून येणाऱ्या त्यांच्या विमान उड्डाणाला तब्बल १२ तासांचा उशीर झाला, ज्यामुळे त्यांना मुंबई विमानतळावर ताटकळत राहावे लागले. मदन लाल यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून संताप व्यक्त केला.
मदन लाल यांनी म्हटले आहे की, "मुंबईहून येणारे माझे विमान १२ तास उशिरा आले. आपल्या देशातील लोकांची कोणीही काळजी घेतली जात नाही. विमानतळ फिश मार्केटसारखेदिसत होते." मदन लाल यांना आलेल्या या अनुभवामुळे देशातील विमान प्रवासाच्या स्थितीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंडिगो सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऑपरेशनल संकटातून जात आहे. शुक्रवारी कंपनीला १,००० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. या मोठ्या गैरसोयीबद्दल इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी प्रवाशांची माफी मागितली आहे.
इंडिगो दररोज सुमारे २ हजार ३०० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवते. इंडिगोच्या प्रवाशांना शनिवारीही ऑपरेशनल समस्यांमुळे अडचणींना सामोरे जावा लागणार आहे. मात्र रद्दीकरण १ हजार पेक्षा कमी होण्याची अपेक्षा असल्याचे सीईओ एल्बर्स यांनी म्हटले. तसेच १० ते १५ डिसेंबर दरम्यान परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्याची अपेक्षा इंडिगोने व्यक्त केली आहे.