Join us  

सलग 21 षटकं निर्धाव, 131 चेंडूत एकही धाव न देणारा 'कंजूस' गोलंदाज आहे तरी कोण?

क्रिकेटच्या इतिहासात नोंदवले गेलेले अनेक विक्रम हे आजही अबाधित आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: January 13, 2020 11:01 AM

Open in App

क्रिकेटच्या इतिहासात नोंदवले गेलेले अनेक विक्रम हे आजही अबाधित आहेत. क्रिकेटच्या बदलत्या स्वरुपानं गोलंदाजांचं महत्त कमी केले आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या आगमनानंतर तर क्रिकेट हा फलंदाजांचाच खेळ झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एखाद्या सामन्याचे श्रेय फार कमी वेळा गोलंदाजाला दिले जाते. पण, क्रिकेटच्या इतिहासाची पानं चाळल्यास भूतकाळात गोलंदाजांची हुकुमत असल्याचे दिसते. विंडीजचे आग ओतणारे गोलंदाजांचे आजही उदाहरण दिले जाते. पण, या सर्वात एका भारतीय गोलंदाजानं असा विक्रम नोंदवला होता की पाच दशकानंतर आजही तो कायम आहे. या गोलंदाजानं तब्बल 21 षटकं सलग निर्धाव टाकली होती आणि 131 चेंडूंनंतर प्रतिस्पर्धी फलंदाजाला पहिली धाव घेण्यात यश आलं होतं. चला तर मग जाणून घेऊया हा 'कंजूस' गोलंदाज कोण आहे...

बापू नाडकर्णी असं या गोलंदाजाचं नाव आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कंजूस गोलंदाज म्हणून नाडकर्णी यांची ओळख आजही ताजी आहे. त्यांनी 1964साली 12 जानेवारीला कसोटीत एका डावात सलग 21 षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम केला होता. मद्रास येथील नेहरू स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या त्या सामन्यात नाडकर्णी यांनी डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना हैराण केलं होतं. हा सामना अनिर्णीत राहिला, परंतु नाडकर्णी यांच्या विक्रमाची हवा राहिली. पाच दशकानंतरही त्यांचा हा विक्रम कोणाला मोडता आलेला नाही.

नाडकर्णी यांनी आपल्या फिरकी गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. नाडकर्णी यांनी पहिल्या डावात 32 षटकं टाकली आणि त्यापैकी 27 षटकं निर्धाव होती. 32 षटकं खेळून काढल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना केवळ 5 धावा करता आल्या होत्या. नाडकर्णी यांनी 0.15च्या इकोनॉमी रन रेटनं गोलंदाजी केली होती आणि दहापेक्षा अधिक षटकं टाकून हा रनरेट ठेवणं, कोणालाही जमलं नाही. नाडकर्णी यांच्या गोलंदाजीवर 131 चेंडूंनंतर इंग्लंडच्या गोलंदाजांना पहिली धाव घेता आली. 

नाडकर्णी यांचा स्पेलपहिलाः 3-3-0-0दुसराः 7-5-2-0तिसराः 19-18-1-0चौथाः 3-1-2-0

जगात सर्वात कंजूस गोलंदाजांमध्ये नाडकर्णी यांचा चौथा क्रमांक येतो. या विक्रमात इंग्लंडचे विलयम एटव्हेल ( 10 कसोटी, इकोनॉमी रेट 1.31), इंग्लंडचेच क्लिफ ग्लैडव्हिन ( 8 कसोटी, इकोनॉमी रेट 1.60) आणि दक्षिण आफ्रिकेचे ट्रेव्हर गॉडर्ड ( 41 कसोटी, इकोनॉमी रेट 1.64) हे आघाडीवर आहेत. 

4 एप्रिल 1933मध्ये महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात नाडकर्णी यांचा जन्म. रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव, परंतु क्रिकेटविश्व त्यांना बापू नाडकर्णी याच नावाने ओळखतं. त्यांनी 41 कसोटी 25.70च्या सरासरीनं एक शतक व 7 अर्धशतकांसह 1414 धावा केल्या, तर गोलंदाजीत 29.07च्या सरासरीनं 88 विकेट्स घेतल्या. 1968मध्ये त्यांनी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. 4 एप्रिलला नाडकर्णी 87 वा वाढदिवस साजरा करतील. 

याच सामन्यात चंदू बोर्डे आणि सलीम दुराणी यांनीही अप्रतिम गोलंदाजी केली होती.चंदू बोर्डेः 67.4-30-88-5 सलीम दुराणीः  43-13-97-3

टॅग्स :आयसीसीमुंबई