Join us

अफगाणिस्तानच्या 16 वर्षीय खेळाडूने तोडला 28 वर्ष जुना रेकॉर्ड, 3350 सामन्यांनंतर घडला पराक्रम

अफगाणिस्तान आणि झिम्बॉम्बेदरम्यान झालेल्या सामन्यात आपल्या गोलंदाजदीने मुजीब उर रहमानने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 15:13 IST

Open in App

नवी दिल्ली - अफगाणिस्तान क्रिकेट संघातील 19 वर्षीय खेळाडू राशिद खाननंतर संघातील अजून एका खेळाडूंच नाव सध्या चर्चेत आहे. या खेळाडूचं वय आहे फक्त 16 वर्ष. आम्ही सांगत आहोत फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान जदरानबद्दल, ज्याने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. अफगाणिस्तान आणि झिम्बॉम्बेदरम्यान झालेल्या सामन्यात आपल्या गोलंदाजदीने मुजीब उर रहमानने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. झिम्बॉम्बेविरोधातील एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात मुजीबने 10 ओव्हर्समध्ये 50 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यासोबतच मुजीब एकदिवसीय सामन्यात सर्वात कमी वयात 5 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. 

मुजीबचं वय सध्या 16 वर्ष 325 दिवस आहे. इतक्या कमी वयात त्याने ही कामगिरी केली आहे. यासोबतच मुजीबने पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वकार युनिसचा 28 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. हा रेकॉर्ड तुटताना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना 3350 एकदिवसीय सामन्यांची वाट पहावी लागली. 

याआधी वकार युनिसने 1990 मध्ये श्रीलंकेविरोधात 18 वर्ष 164 वय असताना पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. हा रेकॉर्ड करणा-यांच्या यादीत तिस-या क्रमांकावर अफगाणिस्तानच्या राशिद खानचं नाव आहे, ज्याने गतवर्षी 18 वर्ष 178 दिवसांचं वय असताना आयर्लंडविरोधातील एकदिवसीय सामन्यात सहा विकेट्स घेतले होते.

याव्यतिरिक्त डावातील पहिली ओव्हर फेकत पाच विकेट घेणारा मुजीब जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड फक्त बरमूडाच्या ड्वेन लिवरोकच्या नावे होता. 

आयपीएलने केलं करोडपती मुजीब तोच खेळाडू आहे ज्याने आयपील 2018 च्या लिलावात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पंजाब टीमने चार कोटींमध्ये मुजीबला खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यावेळी क्रिकेटचाहते त्याला जास्त ओळखत नव्हते. पण आता या रेकॉर्डसोबत मुजीबने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. त्यामुळे येणा-या आयपीएल हंगामात सर्वांचीच नजर त्याच्यावर असणार आहे.