Finn Allen Fastest Century In T20 World Cup History : न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन (Finn Allen) याने आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या उपांत्य फेरीत त्याने १७० धावांचा पाठलाग करताना फक्त ३३ चेंडूंमध्ये शतक साजरे केले. त्याच्या या स्फोटक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने १३ षटकात सामना जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला.
फिन ॲलनचा मोठा पराक्रम, मोडला ख्रिस गेलचा विश्वविक्रम
टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम या आधी ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावे होता. वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराने २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मुंबईच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध खेळताना ४७ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. दहा वर्षांपूर्वीचा हा विक्रम आता मोडीत निघाला आहे.
T20 WC 2026 Final : टॉपर द. आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; 'काठावर पास' न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल
एका डावात अनेक विक्रम
फिन ॲलन याने सेमीफायनलमधील ऐतिहासिक खेळी जलद शतकी खेळीसह एका डावात अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्याची शतकी खेळी ८ षटकाराने बहरलेली होती. यासह त्याने एका हंगामात २० षटकार मारण्याचा डावही साधला. एवढेच नाहीतर त्याची नाबाद १०० धावांची खेळी टी-२० वर्ल्ड कपच्या नॉकआउटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याही ठरली. याआधी २००९ च्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेचा दिग्गज तिलकरत्ने दिलशान याने वेस्ट इंडिज विरुद्ध ९६ धावांची नाबाद खेळी साकारली होती. हा विक्रमही त्याने मागे टाकला.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकवणारे फलंदाज
- फिन ॲलन (न्यूझीलंड) ३३ चेंडूंत शतक विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता ४ मार्च, २०२६
- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) ४७ चेंडूंत शतक विरुद्ध इंग्लंड, मुंबई (WS) १६ मार्च, २०१६
- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) ५० चेंडूंत शतक विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहानिसबर्ग १२ सप्टेंबर, २००७
- हॅरी ब्रुक (इंग्लंड) ५० चेंडूंत शतक विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकले २४ फेब्रुवारी, २०२६
- ब्रेंडन मॅककलम (न्यूझीलंड) ५१ चेंडूत शतक विरुद्ध बांगलादेश, पल्लेकले २१ सप्टेंबर, २०१२