The name of Palghar was raised by Shardul Thakur | शार्दूलने उंचावले पालघरचे नाव, भारताच्या विजयात अष्टपैलू कामगिरी

शार्दूलने उंचावले पालघरचे नाव, भारताच्या विजयात अष्टपैलू कामगिरी

हितेन नाईक -

पालघर : टीम इंडियाच्या ऑस्टेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात पालघर जिल्ह्याच्या शार्दुल ठाकूरने अष्टपैलू कामगिरी करून आपले मोलाचे योगदान दिले. शार्दूलच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारतीय संघाचे स्वप्न पाहणारा शार्दूल पहाटे ४ वाजता पालघरच्या माहीम गावातून मुंबई असा दररोज रेल्वे प्रवास करायचा. शार्दूलच्या आजच्या अष्टपैलू कामगिरीने आजवर त्याने घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना त्याचे वडील निवृत्त शिक्षक नरेंद्र ठाकूर यांनी 'लोकमत'कडे  व्यक्त केली. शार्दूलचे आठवीपर्यंतचे शिक्षण पालघरच्या आनंदाश्रम कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढे नववीसाठी बोईसर येथील तारापूर विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दहावीचे शिक्षण त्याने बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुलमधून पूर्ण केले, तर बारावीपर्यंतचे शिक्षण खालसा कॉलेज आणि पदवीपर्यंतचे शिक्षण रिझवी कॉलेजमधून पूर्ण केले. शालेय क्रिकेट स्पर्धेत त्याने एका षटकात सलग सहा षट्कार मारून  लक्ष वेधून घेतले होते.


 शार्दुल ठाकूरचे आई-वडिल सामना पाहत असताना.

त्याला प्राथमिक गोलंदाजीचे धडे वडराईचे प्रशिक्षक भरत चामरे यांनी दिले. मुंबईच्या १५ वर्षीय क्रिकेट स्पर्धेत निवड झाल्यानंतर प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तो नवनवीन धडे गिरवू लागला. पालघरवरून पहाटे सरावाला येणे त्रासदायक ठरू लागल्याने लाड सरांनी त्याला आपल्या घराचा आश्रय दिला. अजित आगरकरसारखे स्वतःचे अष्टपैलुत्व सिद्ध करण्याचे लक्ष्य बाळगून तो सराव करायचा.

जिद्दीच्या प्रवासाचे मिळाले फळ -
मुंबई रणजी स्पर्धा, भारत अ संघातून खेळताना २०१६ मध्ये त्याची वेस्ट इंडीजविरुद्ध  शार्दूलची वर्णी लागली. त्यानंतर भारतीय कसोटी संघात निवड झाली असताना त्याला दुखापतीने ग्रासले. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध अष्टपैलुत्व सिद्ध करताना चौथ्या कसोटीत शार्दूलने पहिल्या डावात ११५ चेंडूंत ६७ धावा करीत ३ विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४ बळी असे  एकूण सात बळी मिळविले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The name of Palghar was raised by Shardul Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.