Mumbai Indians Ropes in Sherfane Rutherford and releases Mayank Markande | मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू, पण हुकूमी खेळाडूला केले रिलीज
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू, पण हुकूमी खेळाडूला केले रिलीज

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) सर्वाधिक चार जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सने पुढील हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी हुकुमी फिरकीपटू मयांक मार्कंडेला दिल्ली कॅपिटल्सला दिले असून वेस्ट इंडिजच्या युवा शेर्फाने रुथरफोर्डला करारबद्ध केले आहे. 


 याबाबत मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानीने सांगितले की,''मयांकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मयांक हा प्रतिभावान खेळाडू आहे आणि तो आमच्या संघाचा सदस्य होता, याचा अभिमान आहे. हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु मयांकच्या भल्याचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. तो भविष्यात भारतीय क्रिकेट संघातील स्टार असेल. त्याचवेळी शेर्फानेला संघात दाखल करून घेण्याचा आनंदही आहे.''

मुंबईनं चार वेळा ( 2013, 2015, 2017 आणि 2019) आयपीएल जेतेपद उंचावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी 2019च्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जला उपविजेतपदावर समाधान मानण्यास भाग पाडले. मुंबईच्या या विजयात मयांकचाही मोलाचा वाटा आहे. भारताकडून एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळणाऱ्या 21 वर्षीय मयांकने मुंबई इंडियन्सकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानं पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह तीन विकेट्स घेतल्या होत्या. आतापर्यंत त्यानं 17 सामन्यांत 8.54 च्या इकोनॉमी रेटनं 16 विकेट्स घेतल्या आहेत. 

दुसरीकडे 20 वर्षीय शेर्फानेने विविध ट्वेंटी-20 लीगमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूनं गतवर्षी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कॅरेबियन प्रीमिअर लीग, बांगलादेश प्रीमिअर लीग आणि ग्लोबल ट्वेंटी-20 लीग मध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात त्यानं आपली छाप सोडली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं 17 सामन्यांत 486 धावा केल्या आहेत, तर 33 विकेट्स घेतल्या आहेत. 

Web Title: Mumbai Indians Ropes in Sherfane Rutherford and releases Mayank Markande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.