नवी दिल्ली : भारतीय संघ शुक्रवारपासून कोलकातामध्ये सुरु होत असलेल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशविरुद्ध खेळणार असून फलंदाजांना चकविण्यासाठी चेंडूच्या लेंथमध्ये बदल करीत राहील, असे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने म्हटले आहे. शानदार फॉर्मात असलेल्या शमीने इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत सात बळी घेतले होते.
शमी म्हणाला,‘गोलंदाजांना खेळपट्टीवर नजर ठेवावी लागणार आहे. खेळपट्टी संथ असेल तर अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील आणि फलंदाज अडचणीत असल्याचे निदर्शनास आल्यास दडपण निर्माण करावे लागेल. लेंथमध्ये बदल करावे लागतील.’
माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी मयांक अगरवालला इशारा दिला की बांगलादेश संघ आगामी लढतीत चांगल्या तयारीनिशी उतरेल. गावसकर म्हणाले, ‘मयांक कसोटी क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे त्यांचे पहिले वर्ष असून भविष्यात तो लय कायम राखण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे, पण आता प्रतिस्पर्धी संघ अधिक तयारीने उतरेल.’
भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर म्हणाला की, ‘भारताकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. काही संघांकडे चांगले वेगवान गोलंदाज, तर काही संघांकडे चांगले फिरकीपटू आहेत, पण भारताकडे दोन दर्जेदार फिरकीपटू व तीन चांगले वेगवान गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार सध्या खेळत नाहीत. तसे भारताकडे एकूण ८ चांगले गोलंदाज आहेत आणि त्यामुळेच गेल्या दोन वर्षांत भारताने अनेकदा प्रतिस्पर्धी संघांचा डाव गुंडाळला आहे.’ (वृत्तसंस्था)