Mizoram cricketer K. Lalremruata Heart Attack: भारतीय क्रिकेट विश्वातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. मिजोरमचे माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरूआटा यांचे गुरुवारी क्रिकेट मैदानावरच निधन झाले. स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे मिजोरमसह संपूर्ण क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
पवेलियनकडे जाताना कोसळले
38 वर्षीय लालरेमरूआटा एका स्थानिक स्पर्धेत वेंगनुआई रेडर्स क्रिकेट क्लबकडून खेळत होते. फलंदाजी आटोपल्यानंतर ते पवेलियनकडे परतत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली अन् ते मैदानावरच कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सुरुवातीच्या माहितीनुसार हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिजोरम क्रिकेटसाठी मोठी हानी
के. लालरेमरूआटा हे मिजोरम क्रिकेटमधील एक परिचित आणि आदरणीय नाव होते. त्यांनी दोन वेळा रणजी ट्रॉफीमध्ये मिजोरमचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्यांनी सात सामने खेळले होते. राज्यस्तरीय व स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. ते सातत्याने क्लब क्रिकेट खेळत राहिले आणि अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरले.
मिजोरम क्रिकेट संघटना आणि बीसीसीआयकडून शोक व्यक्त
मिजोरम क्रिकेट संघटना (MCA) आणि बीसीसीआय डोमेस्टिककडून लालरेमरूआटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संघटनेच्या निवेदनात म्हटले की, “ही घटना मिजोरम क्रिकेटसाठी मोठी हानी आहे. आम्ही के. लालरेमरूआटा यांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखद प्रसंगी त्यांना धैर्य लाभो, हीच प्रार्थना.”
![]()
मंत्री व क्रीडा विश्वातून प्रतिक्रिया
मिजोरमचे क्रीडा व युवक सेवा मंत्री लालघिंगलोवा हमार यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “सामन्यादरम्यान लालरेमरूआटा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे ते अचानक कोसळले. एका क्रिकेट सामन्यात अशा प्रकारे खेळाडूला गमावणे अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रपरिवाराप्रती आणि संपूर्ण क्रिकेट समुदायाप्रती माझ्या संवेदना आहेत.”