भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आपला दबदबा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी लंका प्रीमिअर लीग ( Lanka Premier League) मध्ये इरफान पठाण खेळणार आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ सोहैल खान याच्या मालकिच्या कँडी टस्कर्स संघाकडून इरफान पठाण खेळणार आहे. या लीगसाठी श्रीलंकेत पोहोचलो असल्याचे ट्विट इरफाननं केलं.
कँडी संघाकडून वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल, लंकेचा कुसल परेला, कुसल मेंडीस, नुवान प्रदीप आणि इंग्लंडचा लायम प्लंकेट खेळणार आहेत. लंका प्रीमिअर लीगमध्ये कोलंबो, कँडी, गॅले, डम्बुल्ला आणि जाफ्ना असे पाच संघ खेळणार असून त्यांच्यात 23 सामने होतील. २६ नोव्हेंबरपासून कोलंबो आणि कँडी यांच्यात सलामाचा सामना होईल. १३ व १४ डिसेंबरला उपांत्य फेरीचे सामने, तर १६ डिसेंबरला अंतिम सामना रंगणार आहे.
भारताच्या 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयी संघाचा सदस्य असलेल्या इरफाननं 4 जानेवारी 2020 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इरफान 2012मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा खेळला होता आणि त्यानंतर त्याला संघातून कॉल आलाच नाही. 2017मध्ये त्यानं अखेरचा IPL सामना खेळला होता. त्यानंतर तो समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला.
इरफाननं 29 कसोटी, 120 वन डे आणि 24 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. कसोटीत त्याच्या नावावर 1105 धावा व 100 विकेट्स आहेत. ट्वेंटी-20त 172 धावा व 28 विकेट्स, तर वन डेत 1544 धावा व 173 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. IPLमध्येही त्यानं 103 सामन्यांत 1139 धावा आणि 80 विकेट्स घेतल्या आहेत.
पाहा व्हिडीओ