दुबई: आयपीएलच्या (IPL 2020) यंदाच्या मोसमात पहिला विजय मिळवण्यासाठी आज किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) संघ मैदानात उतरला आहे. पंजाबचा मुकाबला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी (Royal Challenges Banglore) सुरू आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलनं विक्रमाची नोंद केली. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम राहुलनं केला आहे. त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला.
सचिन तेंडुलकरनं ६३ सामन्यांत आयपीएलमध्ये २ हजार धावांचा टप्पा गाठला होता. तर राहुलला २ हजारांचा टप्पा पूर्ण करण्यास ६० सामने लागले. हीच कामगिरी करण्यास गौतम गंभीरला ६८, सुरेश रैनाला ६९, तर विरेंद्र सेहवागला ७० सामने लागले. आयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण करणारा राहुल ३२ वा खेळाडू ठरला आहे. भारतीय फलंदाजांचा विचार केल्यास त्याचा क्रमांक २० वा लागतो.
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्यानं ४८ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. त्यानंतर शॉन मार्शचा क्रमांक लागतो. त्यानं २ हजार धावा ५२ सामन्यांमध्ये केल्या आहेत. आजच्या सामन्यात राहुलनं जबरदस्त फटकेबाजी केली. त्यानं ६९ चेंडूंमध्ये १३२ धावांची नाबाद खेळी साकारली. यामध्ये १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे.