नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धाची परिस्थिती उद्भवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी सकाळी यंदाच्या आयपीएल-१८ चे सत्र एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ‘दहशतवादाला तोंड देण्यासह देश जेव्हा सीमारेषेवर आक्रमणाचा सामना करीत आहे, अशा परिस्थितीत राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे आहे,’ असे बीसीसीआयने म्हटले.
जम्मू आणि पठाणकोट येथे पाकिस्तानकडून होणाऱ्या हवाई हल्ल्याची सूचना मिळाल्यानंतर गुरुवारी पंजाब-दिल्ली हा धर्मशाळा येथे खेळविण्यात आलेला सामनाही मध्यावरच थांबविण्यात आला होता. यानंतर आयपीएलच्या उर्वरित सत्राबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. बीसीसीआयचे सचिव देवचित सैकिया यांनी एका पत्रकाद्वारे आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित केल्याची माहिती दिली. याआधी, आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
आयपीएलच्या नव्या वेळापत्रकाबाबतची माहिती योग्य वेळ आल्यानंतर देण्यात येईल, असेही सैकिया यांनी म्हटले. उर्वरित आयपीएलमध्ये अद्याप १६ सामने शिल्लक असून, २५ मे रोजी कोलकाता येथे अंतिम सामना रंगणार होता. त्याचवेळी, सप्टेंबर महिन्यातील आशिया चषक स्पर्धा रद्द झाल्यास या कालावधीत आयपीएलचे उर्वरित सामने खेळविता येतील, अशी चर्चाही रंगली आहे. बीसीसीआयने म्हटले की, ‘या महत्त्वाच्या टप्प्यावर बीसीसीआय देशासोबत आहे. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दल आणि देशातील जनतेसोबत एकता व्यक्त करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत देशाचे रक्षण करताना आणि अलीकडच्या दहशतवादी हल्ल्याला आणि पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी केलेल्या विनाकारण आक्रमणाला कडक प्रत्युत्तर देणाऱ्या आपल्या सैनिकांच्या शौर्य, धैर्य व निःस्वार्थ सेवेला बीसीसीआय सलाम करते. भारताच्या सुरक्षेसाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी बीसीसीआय वचनबद्ध असून, नेहमीच राष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेईल.’
विदेशी खेळाडू परतणार
लीग स्थगित झाल्यामुळे सर्व भारतीय आणि विदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना घरी पाठविण्याचा निर्णय बोर्डाने शुक्रवारी घेतला. चेन्नई, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि राजस्थान संघात प्रत्येकी ७, कोलकाता, मुंबई आणि बंगळुरू संघात प्रत्येकी ८ तर लखनौ आणि हैदराबाद संघात ६ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. सर्वच बोर्ड बीसीसीआयच्या सतत संपर्कात होते.
एनसी क्लासिक भालाफेक स्पर्धाही स्थगित
भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धेलाही फटका बसला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन होत असून, ही स्पर्धा बंगळुरू येथे २४ मेला रंगणार होती. या स्पर्धेत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रमुख खेळाडू सहभागी होणार होते.
खेळाडू रेल्वेने दिल्लीला परतले
पंजाब-दिल्ली संघाचे क्रिकेटपटू रेल्वेने नवी दिल्लीला परतले. शुक्रवारी सर्व खेळाडूंना ४० ते ५० लहान वाहनांमधून कांगडा पोलिस दलाने धर्मशाळा येथून होशियारपूरपर्यंत नेले. तेथून पंजाब पोलिसांनी खेळाडूंना जालंधर रेल्वे स्थानकात नेले. त्यानंतर विशेष रेल्वेने ते दिल्लीकडे रवाना झाले.
दुसऱ्यांदा स्थगिती
आयपीएल मध्यावरच स्थगित करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी, २०२१ साली कोरोना महामारीमुळे बायो-बबलमध्ये भारतात आयपीएल रंगली.
मात्र, खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आयपीएल पहिल्यांदाच स्थगित करण्यात आली होती.
यानंतर सप्टेंबरमध्ये उर्वरित सामने खेळविण्यात आले होते. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार असून, ही मालिका ऑगस्टमध्ये संपेल.
आशिया चषकावर बहिष्कार; बांगलादेश दाैरा रद्द करणार!
आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशचा दौरा (ऑगस्ट) करण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय भारत आशिया चषकात (सप्टेंबर) सहभागी होण्याची शक्यता खूप कमी आहे.
गरज भासल्यास बोर्ड उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी त्यावेळेचा वापर करू शकतो, असे विश्वसनीय सूत्रांचे मत आहे. भारत जूनच्या पहिल्या आठवड्यात पाच सामन्यांच्या कसोटी दौऱ्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. तणाव लवकर कमी झाला नाही तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लीग पूर्ण करण्याची बीसीसीआयकडे एकमेव संधी असू शकते.
‘सरकारच्या निर्देशानंतरच सामने’
आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याबाबत बीसीसीआयचे मत काय, स्थगित सामने कधी खेळले जातील, याबाबत विचारताच बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, ‘लीग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय बोर्ड घेऊ शकणार नाही. ते भारत सरकारच्या निर्देशांवर अवलंबून असेल. सरकारने परवानगी दिल्यास तसेच भागीदारांच्या संमतीने उर्वरित सामन्यांचे नव्याने वेळापत्रक जाहीर करू.’
Web Title: IPL postponed for a week; BCCI: National interest is paramount, new schedule will be announced at the appropriate time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.