MS Dhoni Sweet Gesture Win hearts, Fan Selfie Viral Video CSK IPL 2025: सर्वात यशस्वी संघापैकी एक मानला जाणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदा काहीसा गडबडलाय. सलामीचा सामना जिंकल्यानंतर चेन्नईला सलग ५ पराभव पचवावे लागले. त्यानंतर अखेर सोमवारी चेन्नई सुपर किंग्जला हंगामातील दुसरा विजय मिळाला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत १६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या उपयुक्त खेळीच्या बळावर हे लक्ष्य १९.३ षटकांत ५ गडी राखून पूर्ण केले. या विजयाने चेन्नईचे चाहते खुश झाले. असे असतानाच, धोनीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात त्याने केलेल्या कृत्यामुळे त्याने साऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत.
महेंद्रसिंग धोनीचा नुकताच एक विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी चालताना दिसतोय. त्याच्या आजूबाजूला सुरक्षारक्षकांचे कडे आहे. असे असतानाच अचानक धोनीला एक फॅन महिला दिसते. ती महिला व्हीलचेअरवर असते आणि तिला धोनीसोबत सेल्फी घ्यायचा असतो. हे पाहून धोनी लगेच सगळ्यांना थांबवतो. सिक्युरिटी गार्ड धोनीच्या आसपास उभे राहतात, पण धोनी त्यांनाही बाजूला करतो. त्यानंतर धोनी त्या महिलेच्या हातातून मोबाईल घेतो आणि तिच्यासोबत तिच्या मोबाईलमध्ये छानसा सेल्फी काढून देतो. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
धोनी लंगडताना दिसला होता, पण आता एकमद 'फिट'
चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्याला संपूर्ण स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. त्याजागी धोनी कर्णधार झाला आणि लखनौमध्ये LSG विरुद्ध शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करत धोनीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर टीम हॉटेलमध्ये त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. पण यावेळी तो लंगडताना दिसला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. सामन्याच्या शेवटच्या षटकात खेळतानाही तो काहीसा अडचणीत असल्याचे दिसले होते. त्यामुळे जर धोनीची दुखापत गंभीर असती तर हा चेन्नई सुपर किंग्जसाठी खूप मोठा धक्का ठरू शकला असता. पण ताज्या व्हिडीओमध्ये धोनी एकदम फिट & फाइन दिसतोय.
Web Title: IPL 2025 sweet gesture MS Dhoni wins heart by stopping everything for a wheelchair-bound fan even surrounded by security watch video CSK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.