IPL 2025 DC vs KKR : मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनच्या जादुई फिरकीच्या जोरावर गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं दिल्लीचं मैदान मारत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे. घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात २०० पारच्या लढाईत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने फाफ ड्युप्लेसिसच्या फिफ्टीच्या जोरावर सामना जवळपास सेट केला होता. पण सुनील नरेन याने बॅक टू बॅक ओव्हरमध्ये तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामना कोलकताच्या बाजूनं फिरवला. शेवटच्या षटकात हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रसेलनं उत्तम गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला १९० धावांवर रोखलं. कोलकाताच्या संघाने १४ धावांनी सामना जिंकत आपल्या खात्यात महत्त्वपूर्ण दोन गुण जमा केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं दिलेल्या २०५ धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खराब झाली. अभिषेक पोरेल एक चौकार मारून बाद झाला. त्यानंतर फाफ ड्युप्लेसिस याने करुन नायरच्या साथीनं ३९ धावांची भागीदारी रचली. पण करुण नायरही १५ धावांवर बाद झाला. लोकेश राहुल यालाही सुनील नरेन याने धावबाद केले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अवघ्या ६० धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या.
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
कॅप्टन-उपकॅप्टन जोडी जमली
संघ अडचणीत असताना कर्णधार अक्षर पटेल ४३ (२३) अन् उपकर्णधार फाफ ड्युप्लेसिस ६२ (४५) यांनी चौथ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी रचली. ही जोडी सेट झाल्यामुळे सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं झुकला होता. पण सुनील नरेन याने १४ व्या षटकात ही जोडी फोडली. त्याने या षटकातील चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलची विकेट घेतली. याच षटकात त्याने ट्रिस्टन स्टबलाही माघारी धाडले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर १६ व्या षटकात पुन्हा गोलंदाजीवर आल्यावर त्याने फाफ ड्युप्लेसिसची विकेट घेतली अन् मॅच कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूनं झुकली. KKR कडून सुनील नरेन याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय वरुण चक्रवर्तीला २ विकेट्स मिळाल्या. अनुकूल रॉय, वैभव अरोरा आणि आंद्र रसेल यांनीही आपल्या खात्यात प्रत्येकी १-१ विकेट्स जमा केली.
KKR कडून एकानेही केली नाही फिफ्टी, दुसरीकडे फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अक्षर पटेलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सुरुवात चांगली केली. पण ठराविक अंतराने आघाडीच्या फळीतील फलंदाजानी विकेट गमावल्या. पण सलामीवीर गुरबाझ २६ (१२) आणि नरेन २७ (१६) यांच्यासह कर्णधार अजिंक्य रहाणे २६ (१४) संघासाठी उपयुक्त धावाही जोडल्या. अंगकृष्ण रघुवंशी याने ३२ चेंडूत केलेली ४४ धावांची खेळी आणि रिंकू सिंहनं २५ चेंडूत केलेल्या ३६ धावांच्या खेळीसह आंद्रे रसेल याने ९ चेंडूत केलेल्या १७ धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताच्या संघाने निर्धारित २० षटकात २०४ धावा केल्या होत्या. कोलकाताकडून एकानेही अर्धशतक झळकावले नाही. याउलट धावांचा पाठलाग करताना फाफच्या भात्यातून यंदाच्या हंगामातील दुसरी फिफ्टी आली. पण ती शेवटी व्यर्थ ठरली.
Web Title: IPL 2025 DC vs KKR Sunil Narine Magic Kolkata Knight Riders beat Delhi Capitals by 14 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.