Join us  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 

दिनेश कार्तिक व स्वप्निल सिंग यांनी पडझड थांबवली आणि मॅच जिंकवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 10:51 PM

Open in App

IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : १४८ धावांचा पाठलाग करताना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ९२ धावांची सलामी दिली. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १० षटकांत सामना संपवतील असे वाटले होते, परंतु गुजरात टायटन्सच्या जॉश लिटलने सामन्याला कलाटणी दिली. त्याने धडाधड ४ विकेट्स घेऊन बिनबाद ९२ वरून RCB ची अवस्था ६ बाद ११७ अशी केली. बंगळुरूने २५ धावांच्या फरकाने ६ विकेट्स गमावल्याने सामना रंगतदार अवस्थेत आला. पण, दिनेश कार्तिक व स्वप्निल सिंग यांनी पडझड थांबवली आणि मॅच जिंकवली.

विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ५.५ षटकांत ९२ धावा चोपून विजय पक्का केला होता. विराटने सहावी धाव घेताच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १२५०० धावा पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. जॉश लिटलने GT ला पहिले यश मिळवून देताना फॅफला २३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ६४ धावांवर झेलबाद केले. त्यानंतर आलेले  विल जॅक्स ( १), रजत पाटीदार ( २),  ग्लेन मॅक्सवेल ( ४) व कॅमेरून ग्रीन ( १)  चुकीचे फटके मारून माघारी परतले. पण, यात विराट एका बाजूला उभा असल्याने RCB ला धीर वाटत होता. पण, नूर अहमदने गुजरातला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. विराट २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतला आणि RCB ला ११७ धावांवर सहावा धक्का बसला.   दिनेश कार्तिक व स्वप्निल सिंग हे RCB चे शेवटचे आधारस्तंभ होते. कार्तिकने राशिद खानच्या पहिल्या षटकात १६ धावा चोपून दडपण काहीसे कमी केले. या दोघांनी १८ चेंडूंत ३५ धावांची भागीदारी करून संघाचा विजय पक्का केला. स्वप्निल ९ चेंडूंत १५ धावांवर, तर कार्तिक १२ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. RCB ने हा सामना १३.४ षटकांत ६ बाद १५२ धावा करून जिंकला. या विजया सोबतच बंगळुरूने सातव्या क्रमांकावर झेप घेतली, तर मुंबई इंडियन्सची दहाव्या क्रमांकावर घसरण झाली. 

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून RCB ने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय योग्य़ ठरला. मोहम्मद सिराज ( २-२९), यश दयाल ( २-२१) यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. विराट कोहलीने एक भन्नाट रन आऊट करून सामन्याला कलाटणी दिली. विजयकुमार वैशाखने ( २-२३) २०व्या षटकात सलग ३ विकेट मिळवून दिल्या. त्यापैकी एक रन आऊट असल्याने त्याची हॅटट्रिक नाही झाली.  गुजरातचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १४७ धावांत तंबूत परतला. GT कडून मोहम्मद शाहरुख खान ( ३७), डेव्हिड मिलर ( ३०) व राहुल तेवाटिया ( ३५) यांनी चांगला खेळ केला.   

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगुजरात टायटन्समुंबई इंडियन्स