IPL 2021 top 10 are indian players in race for ornage cap | IPL 2021: 'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीत 'इंडियन' तडका!, परदेशी खेळाडूंचा मागमूसच नाही!

IPL 2021: 'ऑरेंज कॅप'च्या शर्यतीत 'इंडियन' तडका!, परदेशी खेळाडूंचा मागमूसच नाही!

IPL 2021, Orange Cap: आयपीएलच्या यंदाच्या १४व्या सत्रात आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत. मंगळवारी झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने कमालीचा खेळ करताना हातातून गेलेला सामना खेचला आणि कोलकाता नाईट रायडर्सला १० धावानी नमवले. यंदाच्या सत्राचे आतापर्यंतचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय खेळाडूंनी पाडलेली छाप. आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात भारतीय खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली असून सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांसाठी असलेल्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्येही भारतीयांमध्येच चढाओढ रंगल्याचे दिसत आहे.

'कोहली ब्रिगेड'ला 'देव' पावला; कोरोनावर मात करून धडाकेबाज सलामीवीर संघात परतला!

मुंबई वि. कोलकाता सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये काही बदल नक्की झाले. मात्र, यामध्ये अद्याप कोणत्याही विदेशी फलंदाजाला स्थान मिळवता आलेले नाही, हे विशेष. आयपीएलच्या प्रत्येक मोसमामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप बहाल करण्यात येते. आतापर्यंत खेळविण्यात आलेल्या सामन्यांत भारतीयांनी छाप पाडली असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीमधील अव्वल पाच स्थानांवर भारतीय खेळाडूंनी कब्जा केला आहे.

कोलकाताला मंगळवारी धक्कादायक पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांच्या नितीश राणाने मात्र सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. नितिशने दोन सामन्यांत १३७ धावा कुटताना सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान काबिज केले आहे. यामध्ये त्याने दोन अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दुसऱ्या स्थानी असून त्याने एकच सामना खेळताना तडाखेबंद शतकाच्या जोरावर ११९ धावा काढल्या आहेत. पंजाब किंग्सविरुद्ध त्याने तुफानी शतक झळकावले होते. मात्र यानंतरही राजस्थानला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 

शाहरुखनं व्यक्त केलेल्या संतापावर आंद्रे रसेलनंही दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

तिसऱ्या स्थानावरील पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने राजस्थानविरुद्ध ९१ धावा केल्या होत्या. चौथ्या स्थानावर मुंबईचा सूर्यकुमार यादव असून त्याने आतापर्यंत २ सामन्यांतून ८७ धावा काढल्या आहेत. यामध्ये ५६ धावांची खेळी त्याची सर्वोत्तम आहे. दिल्ली कॅपिटल्सचा ‘गब्बर’ शिखर धवन पाचव्या स्थानी असून त्याने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध सलामीला ८५ धावांचा तडाखा दिला होता.

इतकेच नाही, तर यापुढील पाच स्थानांवरही भारतीय फलंदाजांनीच कब्जा केला असून पृथ्वी शॉ (सहावे स्थान), दीपक हूडा (सातवे स्थान), रोहित शर्मा (आठवे स्थान), मनीष पांड्ये (नववे स्थान) आणि राहुल त्रिपाठी (दहावे स्थान) यांनी विदेशी फलंदाजांना अद्याप पुढे यायची संधी दिली नाही. सनरायझर्स हैदराबादचा जॉनी बेयरस्टो हा आतापर्यंत छाप पाडणारा पहिला विदेशी फलंदाज ठरला असून त्याने कोलकाविरुद्ध ५५ धावांची खेळी केली होती. तो आॅरेंज कॅपचा शर्यतीत अकराव्या स्थानी असून विदेशी फलंदाजांमध्ये आघाडीवर आहे.

ऑरेंज कॅप शर्यतीतील अव्वल ५ फलंदाज :
   फलंदाज                              सामने      धावा
१. नितिश राणा (कोलकाता) :        २         १३७
२. संजू सॅमसन (राजस्थान) :        १          ११९
३. लोकेश राहुल (पंजाब) :             १           ९१
४. सूर्यकुमार यादव (मुंबई) :         २           ८७
५. शिखर धवन (दिल्ली) :            १           ८५
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 top 10 are indian players in race for ornage cap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.