मुंबई : राजस्थान रॉयल्स सलामीला पराभूत झाल्यानंतर आयपीएलमध्ये दुसऱ्या लढतीत गुरुवारी आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध उतरायचे आहे. दुखापतग्रस्त बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत त्यांची भिस्त कर्णधार संजू सॅमसनच्या कामगिरीवरच असेल.
ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीने सलामीला सीएसकेचा सात गडी राखून पराभव केला. रॉयल्सला मात्र सोमवारी पंजाब किंग्सच्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चार धावांनी पराभव पत्करावा लागला होता. ६३ चेंडूत ११९ धावांची खेळी करणाऱ्या सॅमसनला अखेरच्या चेंडूवर पाच धावा काढता आल्या नाहीत. स्टोक्स हा बोटाच्या दुखण्यामुळे आयपीएलबाहेर पडला. अशावेळी जोस बटलर, शिवम दुबे आणि रियान पराग यांच्यावर दडपण वाढणार आहे. हे सर्वजण मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. सलामी लढतीत गोलंदाजदेखील ढेपाळले. चेतन सकारियाचा अपवाद वगळता पंजाबच्या फलंदाजांवर कुणीही वर्चस्व गाजवू शकले नव्हते. त्यामुळे गोलंदाजी सुधारण्याचे आव्हान संघापुढे असेल.
दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन व पृथ्वी शाॅ हे फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजीत ख्रिस वोक्स, आवेश खान यांनी प्रभावी कामगिरी केली. दुसरीकडे रविचंद्रन अश्विन, टॉम कुरेन, अमित मिश्रा व मार्क्स स्टोयनिस यांनी निराश केले आहे.