नवी दिल्ली : ‘आयपीएलच्या मागच्या पर्वात महेंद्रसिंग धोनीने मला हळुवार यॉर्कर आणि कटर चेंडू टाकण्याचा सल्ला दिला होता. यामुळे काैशल्यपूर्ण मारा करण्यात यशस्वी ठरलो,’ असे मत भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याने बुधवारी व्यक्त केले. ३० वर्षांच्या नटराजनने मागच्या वर्षी आयपीएलच्या वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक ७१ यॉर्कर टाकले होते. धोनी आणि डिव्हिलियर्स अशा दिग्गजांना त्याने बाद केले होते.
नटराजन म्हणाला, ‘धोनीसारख्या खेळाडूसोबत संवाद साधणे माझ्यासाठी मोठी बाब आहे. त्याने माझ्या फिटनेसबाबत जाणून घेतले, शिवाय प्रोत्साहन दिले. अनुभवासोबत आणखी उत्कृष्ट होशील. हळुवार बाऊन्सर, कटर्स आणि विविधता असलेले चेंडू टाकत जा,’ असा सल्ला दिला. हाच सल्ला माझ्यासाठी उपयुक्त ठरला.’
सनरायजर्स हैदराबादच्या या गोलंदाजाने धोनीलाही बाद केले. आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात राखीव म्हणून समावेश झाला. नंतर त्याला मुख्य संघात स्थान मिळाले. या दौऱ्यात त्याने तिन्ही प्रकारात पदार्पण केले. दिग्गज एबी डिव्हिलियर्सला बाद केले त्याच दिवशी नटराजनच्या पत्नीने कन्येला जन्म दिला. याविषयी तो म्हणाला, ‘एकीकडे माझ्या घरी लक्ष्मी आली, तर दुसरीकडे मला बादफेरीत महत्त्वाचा बळी घेता आला. कन्येच्या जन्माची माहिती कुणालाही दिली नव्हती. सामना संपल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने पुरस्कार वितरण सोहळ्यात ही बातमी सर्वांना दिली.’
धोनीला सरळ चेंडू टाकल्यावर त्याने मला 102 मी. इतका दूर षटकार मारला. यानंतर मी त्याला बाद केले. पण आनंद साजरा केला नाही. सामन्यानंतर धोनीसोबत चर्चा केली आणि त्याने टिप्सही दिल्या, असे नटराजन म्हणाला.