मुंबई : गुरुवारी झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने जबरदस्त पुनरागमन करत दिल्ली कॅपिटल्सच्या (RR Vs DC)हातातील सामना हिसकावून घेतला. सामन्यात जास्तवेळ वर्चस्व राखूनही मोक्याच्यावेळी केलेल्या चुकांमुळे दिल्लीला सामना गमवावा लागला. १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाºया राजस्थानचा अर्धा संघ ४२ धावांत बाद केल्यानंतर दिल्लीसाठी मार्ग सोपा झालेला. मात्र, डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांनी तडाखेबंद फटकेबाजी करत सामना फिरवला. या निराशाजनक पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) याने गोलंदाजांना जबाबदार धरले आहे. ( So we lost the match, Delhi captain Rishabh Pant said the reason behind the defeat)
प्रथम फलंदाजी करणाºया दिल्लीकडून एकट्या पंतने झुंज दिली. त्याने कर्णधार म्हणून पहिले अर्धशतक झळकावताना ५१ धावा केल्या. विशेष म्हणजे दिल्लीकडून एकालाही षटकार मारता आला नाही. त्याचवेळी, राजस्थानकडून डेव्हिड मिलरने २, तर ख्रिस मॉरिसने ४ उत्तुंग षटकार ठोकत राजस्थानच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता. हे षटकार राजस्थानच्या विजयात निर्णायक ठरले. त्यामुळेच पंतने आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली.
पंत म्हणाला की, ‘माझ्या मते आमच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली, मात्र अखेरच्या क्षणी आम्ही राजस्थानला वर्चस्वाची संधी दिली. आमच्याकडून याहून चांगली गोलंदाजी झाली असती.’ पंतने पुढे म्हटले की, ‘यावेळी दवाचाही परिणाम झाला. आम्ही १५-२० धावा कमी केल्या. मात्र, तरीही या सामन्यात काही सकारात्कम गोष्टीही घडल्या. गोलंदाजांनी खूप चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे भविष्यात आम्ही विजय मिळवण्यात यशस्वी ठरु अशी आशा आहे.’