मुंबई : राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा यांनी पंजाब किंग्सविरुद्ध अखेरच्या चेंडूसाठी स्ट्राईक स्वत:कडे ठेवण्याच्या कर्णधार संजू सॅमसनच्या निर्णयाचा बचाव केला. कर्णधाराला जबाबदारी स्वीकारताना पाहणे बरे वाटले, असे संगकारा म्हणाले.
सॅमसनने ६३ चेंडूत १२ चौकार आणि सात षटकारांसह ११९ धावा कुटल्या. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याआधी पाचव्या चेंडूवर एक धाव घेण्यास नकार देत सॅमसनने ख्रिस मॉरिसला परत
पाठविले होते.
पत्रकारांशी संवाद साधताना संगकारा म्हणाले, ‘संजू विजय मिळवून देईल असा विश्वास होता. त्याने विजयाच्या दारात नेऊन ठेवले होते. अखेरच्या चेंडूवर मारलेला फटका सीमारेषेच्या पाच फूट आत राहिला. तुम्ही एक धाव व्यर्थ गेल्याविषयी बोलू शकता पण माझ्यासाठी खेळाडू स्वत:वर विश्वास ठेवतो आणि समर्पित वृत्तीने प्रयत्न करतो हे महत्त्वाचे आहे. पुढच्यावेळी तो आम्हाला विजय मिळवून देईल.’
संजू सलग चांगली कामगिरी करेल याविषयी विश्वास वाटतो का, असे विचारताच संगकारा म्हणाले, ‘शानदार सुरुवात झाली की सातत्याचा विचार होतो. सामन्यागणिक खेळात फरक असतो हे समजणे आवश्यक आहे. संजूने चिंतामुक्त होऊन पुढचा सामना खेळावा.’ संगकारा यांनी वेगवान गोलंदाज चेतन सकारिया आणि फलंदाज रियान पराग यांच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘कुटुंबात दु:खाचा डोंगर कोसळला असताना चेतनने उत्कृष्ट मारा करीत बळी घेतले शिवाय शॉर्ट फाईन लेगवर झेलदेखील घेतला. परागला मुक्तपणे खेळताना पाहून आनंद झाला.’