नवी दिल्ली: क्रिकेटच्या छोट्या प्रकारात परिस्थिती हातघाईची आणि आव्हानात्मक असते. खेळताना येणारा ताणतणाव दूर करण्यासाठी खेळाडूंनी शक्कल शोधली नसेल तर नवलच. आयपीएलमध्ये प्रथमच सहभागी होत असलेला ऑस्ट्रेलियचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याने आगळीवेगळी पद्धत शोधली. गोलंदाजी करताना तो हसत- हसत पुढे जाणार आहे.
२४ वर्षांच्या रिचर्डसनने बिग बॅश लीगमध्ये केलेला हा प्रयोग फार यशस्वी ठरला होता. यंदाच्या सत्रात सर्वाधिक गडी बाद करण्याचा मान त्याला मिळाला. त्याच्या मते तुमच्या चेंडूवर षटकार लागला तरी चेहऱ्यावर हास्य कायम असल्यास आयपीएलमधील दडपण झुगारण्यास मदत होणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून दोन कसोटी, १३ वन डे आणि १४ टी-२० सामने खेळलेल्या रिचर्डसनला पंजाब किंग्सने लिलावात १४ कोटी रुपये खर्चून संघात घेतले. तो मोहम्मद शमीसोबत वेगवान माऱ्याची जबाबदारी सांभाळणार आहे.
मागच्या सत्रात डेथ ओव्हरमध्ये कमकुवत ठरलेल्या या संघाला यंदा शमी आणि रिचर्डसन यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. रिचर्डसन म्हणाला,‘मी मैदानात खेळाचा आनंद घेऊ इच्छितो. हे म्हणणे सोपे असले तरी प्रत्यक्षात फार कठीण आहे. आयपीएल ही जगात सर्वांत लोकप्रिय लीग असल्याने प्रत्येक चेंडूवर दडपण असते. गोलंदाजी करताना हसत असेल तर हे दडपण कमी होईल. खरेतर बिग बॅशमध्ये हा प्रयोग केला. हास्य ठेवण्याचा अर्थ स्वत:ला ऊर्जावान राखणे, असा देखील आहे.’
‘भारतात दाखल होताच कोच अनिल कुंबळे यांच्याशी झालेल्या संवादामुळे बिनधास्त बनलो. मोठी रक्कम मिळाल्यामुळे थोडे दडपण असतेच. मैदानावर सेवा देण्यासाठी तुला ही रक्कम मिळाल्याचे कुंबळे यांनी मला सांगितले. माझ्यात मोठी कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे त्यांचे मत होते. मला नेमके कुठल्या कारणास्तव संघात घेण्यात आले, हे जाणून घेणे गरजेचे होते.’ - झाय रिचर्डसन