चेन्नई : आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने बुधवारच्या सामन्यात अखेरच्या षटकात कंबरेपर्यंत टाकलेला फुलटॉस चेंडू नो बॉल ठरविण्याचा पंचाचा निर्णय योग्यच होता, असे मत सनरायजर्स हैदराबादचे कोच ट्रॅव्हर बेलिस यांनी व्यक्त केले. आरसीबीने हा सामना सहा धावांनी जिंकला.
सनरायजर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर त्या निर्णयावर समाधानी नव्हता. बेलिस म्हणाले,‘वॉर्नर नाराज होता, कारण आम्ही चांगले खेळत नव्हतो आणि पराभूत झालो. पहिला चेंडू फलंदाजाच्या शरीराला लक्ष्य आखून टाकण्यात आली नव्हती तर तंबी का देण्यात आली नाही. दुसरा चेंडू नोबॉल देण्यात आला. हा निर्णय योग्यच होता. हर्षलने त्याआधी १८ व्या षटकात चौथा चेंडू देखील नोबॉल टाकला होता, मात्र तो लेगसाईडला होता. त्यावरही तंबी देण्यात आली नव्हती. अखेरच्या षटाकात पुन्हा कंबरेपर्यंत फुलटॉस टाकताच तंबी मिळाली.’
‘आमच्या संघाने ४० पैकी ३५ षटके वर्चस्व गाजविले. अखेरच्या काही षटकात आम्ही धावा मोजल्या. याशिवाय एकाच षटकात तीन फलंदाज बाद होणे हे फलंदाजांचे अपयश होते,’ असे बेलिस यांनी कबूल केले. आरसीबीविरुद्ध मोहम्मद नबीऐवजी जेसन होल्डरला खेळविण्याच्या निर्णयाचे समर्थन करीत बेलिस म्हणाले,‘नबीला आधीच्या सामन्यात जखम झाल्याने तो फिट नव्हता. डोके जड होते आणि अंगात ताप होता.’ सामन्याआधी दोन दिवसांच्या सरावापैकी एक दिवस त्याने सराव केला होता,’ असे बेलिस यांनी सांगितले.