IPL 2021 Formidable Mumbai Indians eye hat trick Virat Kohli aims to break RCB deadlock | IPL 2021: मुंबई इंडियन्स हॅट्‌ट्रिकसाठी उत्सुक; आयपीएलचे १४वे पर्व आजपासून

IPL 2021: मुंबई इंडियन्स हॅट्‌ट्रिकसाठी उत्सुक; आयपीएलचे १४वे पर्व आजपासून

चेन्नई : जगातील सर्वात लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाचा थरार कोरोना प्रकोपात शुक्रवारपासून (दि. ९) रंगणार आहे. प्रेक्षकांविना सर्व सामने बायोबबल्समध्ये खेळविले जातील. सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांच्यात होत आहे.

रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ जेतेपदाच्या हॅट्‌ट्रिकसाठी खेळणार असून, विराटच्या आरसीबी संघाची नजर मात्र पहिल्या जेतेपदाकडे असेल. अनुभवी महेंद्रसिंह धोनीवरदेखील लक्ष असेल. त्याच्या नेतृत्वाखालील सीएसके संघ मागच्यावर्षी प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरल्यामुळे यंदा नव्या डावपेचांसह उतरणार आहे. पाच महिन्यात दोनदा लीगचे आयोजन होत असल्याने हितधारकांसाठी आदर्शस्थिती नाही. प्रेक्षकांसाठी मात्र कोरोना संकटात सात आठवडे मनोरंजनाची पर्वणी असेल. उत्तुंग षटकार, यॉर्कर, नव्या दमाच्या खेळाडूंची कामगिरी न्याहाळण्याची चाहत्यांना संधी राहील.

मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट परतली. दररोज एक लाखाहून अधिक रुग्ण बाधित होत आहेत. आयपीएलशी संबंधित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला लागण झाल्यानंतरदेखील स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. बायोबबल्समध्ये यूएईप्रमाणे भारतातही हे आयोजन यशस्वी होईल, अशी बीसीसीआयला आशा आहे. ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारतात होणार असल्यामुळे आयपीएलचे यशस्वी आयोजन होणे आयोजकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते.

कोहली या स्पर्धेच्या निमित्ताने विश्वचषकातील संभाव्य खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष ठेवणार असून, इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन आणि किरोन पोलार्ड हेदेखील आपापल्या सहकाऱ्यांची कामगिरी लक्षात घेणार आहेत. दरम्यान, धोनीची नजर असेल ती वानखेडेच्या पाटा खेळपट्टीवर. सीएसकेला पहिला सामना येथेच खेळायचा आहे. अनुभवी सुरेश रैना, इम्रान ताहिर हे संघाचे आधारस्तंभ असून, अष्टपैलू सॅम कुरेन आणि मोईन अली हे कुठल्याही स्थानावर खेळू शकतील.

ऋषभ पंत पहिल्यांदा दिल्लीचे नेतृत्व करणार असल्याने कामगिरीचा ठसा उमटविण्यास उत्सुक असेल. त्याच्या संघात पृथ्वी शॉ, मार्क्‌स स्टोयनिस, शिमरोन हेटमायर, स्टीव्ह स्मिथ आणि अजिंक्य राहणे असे अनुभवी फलंदाज आहेत. गोलंदाजीचा भार कागिसो रबाडा, एन्रिच नॉर्खिया, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, अक्षर पटेल यांच्या खांद्यावर असेल. मागचा उपविजेता संघ एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत दिसतो.

सनरायजर्स हैदराबाद हा सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो. संघाकडे डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, केन विलियम्सन, जेसन होल्डर, जेसन रॉय, जॉनी बेयरेस्टॉहे टी-२० तज्ज्ञ फलंदाज आहेत.

केकेआरला आक्रमक आंद्रे रसेल याला सूर गवसण्याची प्रतीक्षा असेल. वरुण चक्रवर्ती हादेखील पुन्हा दमदार कामगिरी करू शकतो. मर्यादित षटकांच्या सामन्यात सर्वोत्कृष्ट कर्णधार असलेल्या इयोन मॉर्गनकडे संघाचे नेतृत्व आहे. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरेन हा संघाचा आधार मानला जातो.

संघाचे नाव बदलणाऱ्या पंजाब किंग्सला यंदा भाग्य बदलण्याची अपेक्षा असावी. कर्णधार लोकेश राहुलवर विसंबून असलेल्या या संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी परतला. ख्रिस गेल याच्या तुफानी फटकेबाजीची प्रतीक्षा आहेच.

राजस्थान रॉयल्स जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत सुरुवातीचे सामने खेळणार आहे. संजू सॅमसन याच्या मार्गदर्शनात बेन स्टोक्स, जोस बटलर आणि ख्रिस मॉरिस यांच्या कामगिरीवर वाटचाल विसंबून असेल. मागील काही पर्वात या संघात सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव जाणवला होता.

विराटच्या नेतृत्वात आरसीबीचे संयोजन मुंबईइतके प्रभावी जाणवत नाही. ग्लेन मॅक्सवेलवर मोठी रक्कम खर्च केली तसेच न्यूझीलंडचा काईल जेमिसन हा एका रात्रीत कोट्यधीश झाला. मात्र भारतीय खेळपट्ट्यांवर त्याची गोलंदाजी किती यशस्वी होईल, हे सांगणे कठीण आहे. 
देवदत्त पडिक्कल दुसऱ्यांदा मैदानात उतरणार आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वच संघांनी डावपेच आखले असावेत. युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी हे मधल्या षटकात प्रभावी ठरले नव्हते.

पाच जेतेपदासह आयपीएल इतिहासात सर्वांत यशस्वी कर्णधार रोहित शर्मा मुंबईसाठी सहाव्यांदा जेतेपद मिळविण्यास इच्छुक आहे. रोहित फलंदाजीत अपयशी ठरल्यास क्विंटन डिकॉक सज्ज असेलच. हे दोघेही अपयशी ठरले तर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी येईल. 

आघाडीची फळी धावा काढण्यात अपयशी ठरल्यास हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू आणि पोलार्ड यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल, अशी फ्रॅन्चायजीला अपेक्षा आहे. गोलंदाजीची भिस्त ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहर यांच्यावर असेल. मुंबईचा दिवस खराब असेल तरच हा संघ पराभूत होतो अन्यथा विरोधी संघावर तुटून पडतो.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 Formidable Mumbai Indians eye hat trick Virat Kohli aims to break RCB deadlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.