IPL 2021 : आणखी एक पराभव मुंबईला संकटात टाकू शकतो!

‘सुपर संडे’ला प्रत्येकी दोन सामने जिंकणारे संघ परस्परांविरुद्ध खेळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:19 AM2021-09-26T10:19:51+5:302021-09-26T10:21:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Another defeat could put Mumbai indian in trouble cricket super sunday sunil gavaskar | IPL 2021 : आणखी एक पराभव मुंबईला संकटात टाकू शकतो!

संग्रहित छायाचित्र

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे‘सुपर संडे’ला प्रत्येकी दोन सामने जिंकणारे संघ परस्परांविरुद्ध खेळणार आहेत.

सुनील गावस्कर
‘सुपर संडे’ला प्रत्येकी दोन सामने जिंकणारे संघ परस्परांविरुद्ध खेळणार आहेत. त्याचवेळी दोन्ही सामने गमाविणारे संघदेखील एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. सामन्यांचा निकाल मात्र कुणासाठी निर्णायक, तर कुणासाठी धक्कादायी ठरेल. भारतात पहिल्या टप्प्यात सहज खेळणारे संघ यूएईत संकटात आले. मोठ्या मैदानांवर खेळताना फलंदाज सीमारेषेवर झेलबाद होत आहेत. यामुळे एक प्रश्न पुढे येतो तो हा की, जेथे मैदाने मोठी आहेत, त्याठिकाणी सीमारेषा वाढविण्यात का येत नाही? गोलंदाजांसाठी कर्दनकाळ असलेल्या या प्रकारात यामुळे समानता निर्माण होऊ शकेल.
आरसीबीचे अनेक फलंदाज क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर मैदानावर आल्यामुळे टायमिंग साधण्यात त्यांना त्रास जाणवतो. त्यांचे गोलंदाजही पाटा खेळपट्टीवर ताळमेळ साधू शकले नाहीत.

मुंबई संघ लीगमध्ये मंद सुरुवातीसाठी ओळखला जातो. त्यांच्याकडे १४ सामने असतात; पण यापुढे एक जरी पराभव झाला तरी, त्यांचा प्ले ऑफचा मार्ग खुंटू शकतो. भारतीय संघात स्थान मिळालेल्या फलंदाजांना धावा काढाव्याच लागतील. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे फटकेबाज आहेत, यात शंका नाही; मात्र पहिल्या चेंडूपासून तुटून पडण्याऐवजी सामन्यातील स्थिती तसेच संघाची गरज ओळखून खेळणे दोघांसाठी लाभदायी ठरेल.

मागच्या दोन्ही सामन्यांत केकेआर आणि सीएसकेचे गोलंदाज प्रभावी ठरले. यामुळे कुठला संघ सामन्यात बाजी मारेल, याचा निर्णय गोलंदाजच घेतील. अबुधाबीत केकेआर तिसऱ्यांदा खेळणार असल्याने हे त्यांचे स्थानिक मैदान झाले. सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांनी फलंदाजांना चक्रव्यूहात अडकवले आहे. दोघांना निष्प्रभ करण्यासाठी धोनीला त्यांचा मारा सुरू असताना फलंदाजीला येणे गरजेचे असेल.

केकेआरचा युवा फलंदाज व्यंकटेश अय्यरने लक्षवेधी कामगिरी केली. दीपक चहर, जोश हेजलवूड, ड्वेन ब्राव्हो आणि शार्दुल ठाकूर यांच्याविरुद्ध तो पुन्हा यशस्वी झाल्यास केकेआरला मोठ्या धावा उभारुन देईल. याआधी फलंदाजांनीच केकेआरला निराश केले होते, मात्र अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी वेगवान धावा काढण्याचे तंत्र अवलंबले आहे. दोन्ही सामन्यातील रोमांचक क्षण ‘सुपर संडे’चा आनंद देणारे असतील. 

Web Title: IPL 2021 Another defeat could put Mumbai indian in trouble cricket super sunday sunil gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.