दुबई - आयपीएलमध्ये आज झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादनेकिंग्स इलेव्हन पंजाबवर ६९ धावांना दणदणीत विजय मिळवला. हैदराबादने दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव सुरुवातीपासूनच कोसळला. दरम्यान, पंजाबची फलंदाजी सुरू असताना मैदानावर अशी घटना घडली ज्याची चर्चा सामन्यानंतरही सुरू आहे.
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा अर्धा संघ ११५ धावांत माघारी परतला होता. त्यानंतर विस्फोटक फलंदाजी करत असलेला निकोसल पूरन आणि मुजीब उर रहमान फलंदाजी करत होते. दरम्यान, खलील अहमदने टाकलेल्या १३ व्या षटकातील तिसरा चेंडू मुजीबच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकडे गेला. क्षेत्ररक्षकांनी अपील केले. मात्र पंचांनी फलंदाजाला बाद न ठरवता निर्णय तिसऱ्या पंचांवर सोपवला. तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर मुजीबला बाद ठरवले. त्यानंतर माघारी परतत असलेल्या मुजीबने अचानक तिसऱ्या पंचांच्या निर्णयाविरोधात डीआरएसद्वारे दाद मागितली. त्यानंतर हा निर्णय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे गेला. तेव्हा तिसऱ्या पंचांनी रिप्ले आणि अल्ट्रा एजची पाहणी करत मुजीबला बाद ठरवले.
आज झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (५२) आणि जॉनी बेअरस्टो (९७) यांच्या तडाखेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने २०१ धावा करत पंजाब समोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्ममध्ये असलेला मयांक अग्रवाल ९ धावा काढून धावबाद झाला. तर कर्णधार लोकेश राहुलनेही निराशा केली. त्यानंतर निकोलस पूरनने स्फोटक खेळी करत पंजाबचे आव्हान जिवंत ठेवले. त्याने ३७ चेंडूत ७७ धावा कुटल्या. मात्र पुरन बाद झाल्यानंतर पंजाबचे आव्हान संपुष्टात आले. अखेरीस पंजाबचा डाव १३१ धावांत आटोपला.