IPL 2019: Why Mumbai Indians take Yuvraj singh? Mumbai Indians Zaheer khan give reply | IPL2019: युवराज सिंगला संघात का घेतलं? मुंबई इंडियन्सच्या 'झॅक'चं उत्तर 
IPL2019: युवराज सिंगला संघात का घेतलं? मुंबई इंडियन्सच्या 'झॅक'चं उत्तर 

मुंबई : इंडियन्स प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) १२ व्या हंगामाच्या लिलावात युवराज सिंगला अखेरच्या टप्प्यापर्यंत कोणताही वाली नव्हता. एकाही संघाने त्याला घेण्यासाठी उत्सुकता दाखवली नाही. पण मुंबई इंडियन्सने अगदी अखेरच्या क्षणी युवीला आपलेसे केले. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचे चाहत्यांनी भरभरून स्वागत केले. पण मुंबई इंडियन्सने अगदी अखेरच्या क्षणाला युवीला का घेतले, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला. अखेरीस मंगळवारी मुंबईच्या झहीर खानने याचे उत्तर दिले. 

आयपीएलच्या १२ व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना २४ मार्चला घरच्या मैदानावर खेळेल. तत्पूर्वी मुंबईच्या झहीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी प्रसारमाध्यमांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली.  या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवराजच्या कामगिरीच्या सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी युवीही तितकाच उत्सुक आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलसाठी युवराजही कसून तयारी करत आहे.

युवीला संघात का घेतले, या प्रश्नावर मुंबई इंडियन्सच्या झहीरनं उत्तर दिलं की,''लिलावात बरेच खेळाडूंवर बोली लागली नाही. माझ्यावरही पहिल्या टप्प्यात बोली लागलेली नव्हती. लिलावात प्रत्येक संघ एक रणनिती ठरवून बोली लावतो. त्यामुळेच युवराजला अखेरच्या फेरीत का घेतले, पहिल्याच फेरीत का नाही, यावर उत्तर देऊ शकत नाही. पण, युवराज ताफ्यात दाखल झाल्यामुळे संघात चैतन्य संचारले आहे.''

2018च्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना युवीला आठ सामने खेळवण्यात आले. त्यात त्याला 10.83च्या सरासरीनं केवळ 65 धावा करता आल्या. त्यानंतर युवीला राष्ट्रीय संघातूनही बाहेर करण्यात आले आणि किंग्स इलेव्हन पंजाबनेही त्याला करारमुक्त केले. मुंबई इंडियन्सने लिलावात अगदी अखेरच्या टप्प्यात युवीला 1 लाखाच्या मुळ किंमतीत आपल्या चमूत दाखल करून घेतले. युवीनं यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाबसह दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

झहीर पुढे म्हणाला,''मधल्या फळीत संघाला सावरणारा अनुभवी खेळाडू आम्हाला हवा होता आणि युवराजपेक्षा चांगला खेळाडू कोण असू शकतो? युवराजही या संधीचं सोनं करण्यासाठी आतुर आहे. आयपीएलमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी तो सर्वोत्तम खेळ करेल आणि त्याच्या चाहत्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.  


Web Title: IPL 2019: Why Mumbai Indians take Yuvraj singh? Mumbai Indians Zaheer khan give reply
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.