करण दर्डा
कार्यकारी संचालक आणि संपादकीय संचालक लोकमत मीडिया समूह
दक्षिण आफ्रिकेला कमकुवत मानून घरच्या खेळपट्ट्यांवर गाफील राहिलेल्या भारतीय संघाला वर्षभरात सलग दुसऱ्यांदा मायदेशात क्लीन स्वीपची नामुष्की स्वीकारावी लागली. मालिकेत रवींद्र जडेजाचा अपवाद वगळता सर्वच खेळाडू बेभरवशाचे ठरले.
काळजीवाहू कर्णधारपद सांभाळणाऱ्या ऋषभ पंतने अतांत्रिक फटकेबाजी करत अक्षरश: स्वत:चा बळी दिला. नेतृत्वाची चुणूक त्याच्यात दिसली नाही. एकूणच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या जाळ्यात भारतीय संघ अलगद अडकला. या संपूर्ण मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीचे केेलेले हे मूल्यमापन...
रवींद्र जडेजा
चांगली कामगिरी करणारा संघातील एकमेव खेळाडू. त्याने १०५ धावा केल्या आणि १० बळीदेखील घेतले. जडेजाला गोलंदाज किंवा संघसहकाऱ्यांकडून पुरेसे सहकार्य मिळाले नाही. लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचूनही पहिली कसोटी जिंकण्यासाठी त्याची फलंदाजीतील मेहनत पुरेशी ठरली नाही.
जसप्रीत बुमराह
कोलकाता येथील पहिल्या कसोटीतील पाच बळी वगळता, बुमराह त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हता. असे सहसा कधी होत नाही, पण ते यावेळी घडले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध एक योजना आखली होती, जी त्यांनी विशेषतः गुवाहाटीमध्ये खूप चांगल्या प्रकारे अमलात आणली.
वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टनने या मालिकेत एकूण १२४ धावा केल्या, पण त्याची गोलंदाजी प्रभावी ठरली नाही. त्याला केवळ एक बळी मिळाला आणि तो त्याच्या सर्वोत्तम गोलंदाजी फॉर्ममध्ये दिसला नाही. वॉशिंग्टन सुंदरला पहिल्या कसोटीत मिळालेले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे आव्हान पेलवले नाही.
कुलदीप यादव
चार डावांमध्ये कुलदीपने एकूण आठ बळी घेतले; संख्यात्मकदृष्ट्या पाहिल्यास त्याने आपले काम केले होते. परंतु, दक्षिण आफ्रिकेचा सायमन हार्मर त्याच्यापेक्षा सरस ठरला. कदाचित केशव महाराजनेही कुलदीपपेक्षा उजवी कामगिरी केली. भारताचा हा चायनामन गोलंदाज त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.
अक्षर पटेल
पहिल्या कसोटीत १६ आणि २६ धावा केल्या आणि नंतर दोन बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने फलंदाजीमध्ये कडवी झुंज दिली होती. तसेच टीम इंडियाला लक्ष्याच्या जवळ नेले. गुवाहाटीमध्ये त्याला अंतिम संघात स्थान न मिळणे आश्चर्यकारक होते.
मोहम्मद सिराज
सिराजने चांगली गोलंदाजी केली आणि सहा बळी मिळवले. मात्र, गुवाहाटी कसोटीत तो दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांइतका प्रभावी ठरला नाही.
यशस्वी जैस्वाल
यशस्वीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तो भारताच्या त्या दोन फलंदाजांपैकी एक होता, ज्यांनी या मालिकेत अर्धशतक झळकावले. पण ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूंबाबत त्याची कमजोरी कायम राहिली.
ऋषभ पंत
स्टँड-इन कर्णधार म्हणून त्याने २७, २, ७ आणि १३ धावा केल्या. क्षेत्ररक्षण लावण्याची त्याची पद्धत आणि गोलंदाजीतीत केलेले बदल सपशेल अपयशी ठरले. महत्त्वाचे म्हणजे त्याने ज्या प्रकारे स्वत:ची विकेट फेकली ते बेजबाबदारपणाचे होते.
लोकेश राहुल
पुन्हा एकदा भारतात तो धावा करू शकला नाही. ४ डावांमध्ये त्याने ६८ धावा केल्या. त्यामुळे स्पष्टपणे तो मालिकेत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला. स्लिपमध्ये त्याने काही महत्त्वाचे झेल सोडले.
साई सुदर्शन
सुदर्शनने भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी आवश्यक असलेले तंत्र किंवा मनोधैर्य दाखवले नाही. त्याने २९ धावा केल्या. गुवाहाटीच्या दुसऱ्या डावात त्याने १४ धावा करण्यासाठी १३९ चेंडू खेळले.
नितीश कुमार रेड्डी
रेड्डीने दोन डावांमध्ये १० धावा केल्या आणि त्याला एकही बळी मिळावता आला नाही. त्याला गोलंदाज म्हणून वापरले गेले नाही. त्यामुळे केवळ फलंदाज म्हणून रेड्डीला संघात समाविष्ट करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच्या कामगिरीने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
ध्रुव जुरेल
दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धचा त्याचा फॉर्म पाहता, त्याच्याकडून मोठ्या धावा करण्याची अपेक्षा ठेवून त्याला संघात स्थान देण्यात आले होते.पण त्याने चार डावांमध्ये केवळ २९ धावा केल्या आणि बेजबाबदार फटके खेळून तो बाद झाला.