Indian team currently in tornado form! | भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये!
भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये!

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमत

बांगलादेशचा पहिल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या दारुण पराभव पाहणे अत्यंत निराशाजनक होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणे ही बाब सोडली, तर बांगलादेशसाठी काहीही चांगले घडले नाही. त्यांची फलंदाजी अत्यंत खराब झाली, गोलंदाजी सुमार, तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा अत्यंत खालावलेला होता. खरं म्हणजे अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत बांगलादेशचा खेळ अत्यंत निराशाजनक झाला. शाकिब अल हसन आणि तमिम इक्बाल भारत दौऱ्यावर आले नाहीत, तर मुस्तफिझूर रहमान दुखापतग्रस्त असल्याने खेळला नाही. यामुळे बांगलादेशचा संघ या सामन्यात कधीही लढताना दिसला नाही.

खेळपट्टी योग्य होती. हवामानही चांगले होते आणि अशा परिस्थितीत बांगलादेशचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणार होता. या स्पर्धेत गुण मिळविण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण असल्याची जाणीव प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला आहे. त्यामुळेच बांगलादेशने नवखे खेळाडू खेळविण्याची केलेली चूक कोणत्याही संघाने केली नसती. हा सामना केवळ तीन दिवसांत संपला आणि यावरूनच बांगलादेशचा संघ मैदानावर किती कमजोर होता, हे दिसून येईल.

त्याउलट मला भारतीय संघाच्या दमदार कामगिरीवर लक्ष देणे आवडेल. आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशला पूर्णपणे दबावाखाली ठेवले. कामगिरीत काही चढ-उतार झाल्यानंतरही भारताने एक डाव आणि १३० धावांनी मिळविलेला विजय पाहता भारताच्या शानदार फॉर्मची कल्पना येते. सर्वात महत्त्वाचे भारताने दोन प्रमुख फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतरही बांगलादेशला विशेष फायदा झाला नाही. ३ बाद ११९ धावा अशी अवस्था असताना भारतीय संघ ३००-३२५ धावांच्या आसपास मजल मारेल अशी शक्यता होती. मात्र, यानंतर भारताने ६ बाद ४९३ धावांवर डाव घोषित करून आपली फलंदाजी किती खोलवर आहे हे दाखवून दिले. भारताने केवळ ११४ षटकांत ४९३ धावा फटकावल्या. त्यात रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांंनी तडाखेबंद फटकेबाजी करत जवळपास १०च्या धावगतीने धावा काढल्या. या दरम्यान बांगलादेशवर प्रचंड दडपणही आले होते.

त्याच वेळी कोहलीने जम बसलेल्या जडेजाला शतक पूर्ण करण्याची संधी न देता संघ हिताला प्राधान्य देत डाव घोषित केला आणि यानंतर गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत बांगलादेशला गुंडाळले. यावरून भारतीय संघात वैयक्तिक खेळापेक्षा सांघिक कामगिरीला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे पुन्हा दिसून आले. भारतीय विजयाचे वैशिष्ट्य नक्कीच मयांक अगरवालची २४३ धावांची खेळी ठरली. केवळ ८ कसोटी सामन्यांतूनच त्याने ८०० हून अधिक धावा फटकावल्या आहेत. वेगवान आणि फिरकीपटूंविरुद्ध त्याने सारखेच वर्चस्व राखले.
एकीकडे मयांक सामनावीर ठरला असला, तरी गोलंदाजांचे योगदानही विसरता येणार नाही. खास करून वेगवान गोलंदाजांची कामगिरी. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने मिळून १४ बळी घेत बांगलादेशचा धुव्वा उडविला. साधारणपणे भारतात फिरकीपटूंचे वर्चस्व पाहण्यास मिळते, पण या आधी झालेल्या द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही भारतीय वेगवान गोलंदाजांनी दबदबा राखला होता. हे तिन्ही गोलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, यानंतर जसपरीत बुमराहची यांच्यात भर पडली की, भारतीय वेगवान गोलंदाजीला अधिकच धार येईल.

Web Title: Indian team currently in tornado form!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.