नवी दिल्ली : या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय महिला क्रिकेट संघातील एका खेळाडूशी फिक्सिंगसाठी संपर्क करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती सोमवारी मिळाली. त्याचवेळी, तामिळनाडू प्रीमियर लीग (टीएनपीएल) स्पर्धेत प्रशिक्षक आणि अधिकारी फिक्सिंगप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकले. यामुळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटवर फिक्सिंगचे काळे ढग जमा झाल्याचे दिसून आले.
भारतीय महिला क्रिकेट संघातील एका सदस्यासोबत सट्टेबाजांनी या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान फिक्सिंगसाठी संपर्क साधला होता, अशी माहिती मिळाली. यानंतर बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने (एसीयू) दोन व्यक्तींविरुद्ध सोमवारी तक्रार नोंदवली.
एसीयू प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी याप्रकरणी सांगितले की, ‘ज्या खेळाडूशी संपर्क साधण्यात आला होता, ती भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्यामुळे आयसीसीने याप्रकरणी चौकशी केली. आयसीसीने संपर्क करणाऱ्या व्यक्तीला बजावले असून याविषयी आम्हाला सूचनाही दिल्या. तसेच, त्या खेळाडूने याविषयी वेळीच कळवून योग्य कार्य केल्याचेही सांगितले.’ याप्रकरणी एसीयूने बंगळुरु पोलीस ठाण्यात राकेश बाफना व जितेंद्र कोठारी यांच्याविरुद्ध कथितपद्धतीने संपर्क साधल्याने तक्रार नोंदवली.
दुसरीकडे, तामिळनाडू क्रिकेट संघटनेद्वारे सुरु असलेल्या टीएनपीएलमध्ये काही प्रथम श्रेणी क्रिकेटपटू व काही प्रशिक्षकांची संशयास्पदरीत्या सामना निकाल निश्चितप्रकरणी एसीयूद्वारा चौकशी होऊ शकते. याप्रकरणी शेखावत यांनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूचा यामध्ये समावेश असल्याची शक्यता फेटाळली. (वृत्तसंस्था)