India vs West Indies: We are not scared of any team, say Rohit Sharma ahead of 3re T20I | India vs West Indies: आम्ही कोणत्याच संघाला घाबरत नाही, रोहित शर्माचा दावा
India vs West Indies: आम्ही कोणत्याच संघाला घाबरत नाही, रोहित शर्माचा दावा

ठळक मुद्देभारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा ट्वेंटी-20 सामना उद्यामुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार मालिका विजयाचा सामना

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. लेंडल सिमन्सच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं दुसरा सामना जिंकला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या निकालामुळे तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना समसमान संधी मिळाली आहे. त्यामुळे वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार खेळ पाहायला मिळेल, हे निश्चित आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला हिटमॅन रोहित शर्मानं आम्ही कोणत्याच संघाला घाबरत नाही, असा दावा करताना उद्याच्या लढतीसाठी सज्ज असल्याचे सांगितले.

ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना टीम इंडियानं 6 विकेट व 8 चेंडू राखून जिंकला. वेस्ट इंडिजच्या 5 बाद 207 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं 18.4 षटकांत पार केलं. कर्णधार विराट कोहलीनं नाबाद 94 धावांची खेळी करून भारताला ट्वेंटी-20 क्रिकेटमधील मोठा विजय मिळवून दिला. पण, दुसऱ्या सामन्यात विंडीजनं कमबॅक केलं. लेंडन सिमन्स, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, एव्हिन लुइस यांनी दमदार खेळ करताना विंडीजला 8 विकेट व 9 चेंडू राखून विजय मिळवून दिला. 

तिसऱ्या सामन्यापूर्वी रोहितनं संघ मालिका विजयासाठी सज्ज असल्याचे सांगितले. तो म्हणाला,''मला अन्य संघांबद्दल माहित नाही, परंतु आम्ही कोणत्याच संघाला घाबरत नाही. त्या दिवशी त्यांचा खेळ सर्वोत्तम झाला, आमचा नाही आणि त्यामुळे ते जिंकले. आमची कामगिरी चांगली झाली, तर आम्ही कोणताही सामना, कोणत्याही परिस्थितीत जिंकू...त्यामुळे उद्याच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न आहे.''
 

पाहा व्हिडीओ...

 किरॉन पोलार्डचे कौतुक करताना रोहितनं सांगितला कोहलीला पुढील धोका
सामन्याच्या पूर्वसंध्येला हिटमॅन रोहित शर्मानं विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डचे कौतुक केले. त्यानं हे कौतुक करताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला जणू पुढील धोक्याची जाण करून दिली. वानखेडे स्टेडियम आणि पोलार्ड यांचे वेगळे नाते आहे. पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे आणि येथील खेळपट्टीचा त्याला चांगला अभ्यास आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पोलार्डचा हा अनुभव संघाच्या कामी येईल, असं मत विंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,''वानखेडे स्टेडियमवर पोलार्ड अनेक सामने खेळला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमुळे त्याच्या गाठीशी आलेला अनुभव उद्या संघाच्या कामी येणार आहे.''

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानंही मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्याचे कौतुक केले. तो म्हणाला,'' मुंबई इंडियन्सच्या महत्त्वांच्या निर्णयांमध्ये पोलार्डचा सहभाग असतो. दुखापतीमुळे मला एका सामन्याला मुकावे लागले होते, तेव्हा त्यानं नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. तो नक्की कसा विचार करतो हे मला माहित आहे. त्याला सामन्याची योग्य जाण असते. कोणत्या खेळाडूचा कसा उपयोग करून घ्यायचा, याचा चांगला अभ्यास आहे आणि मैदानावर त्याची कशी अंमलबजावणी करायची, हेही त्याला चांगले माहित आहे.'' 
 

Web Title: India vs West Indies: We are not scared of any team, say Rohit Sharma ahead of 3re T20I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.