अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांनी आपापला मोर्चा कसोटी मालिकेकडे वळवला आहे. 22 ऑगस्टपासून सुरू होणारी ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोडणारी आहे.  1948मध्ये उभय संघ प्रथम एकमेकांना भिडले होते आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 1-0 अशी बाजी मारली होती. त्यानंतर भारताला सलग चार मालिका गमवाव्या लागल्या. 1971 मध्ये सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना भारताला वेस्ट इंडिजवर पहिला कसोटी विजय मिळवून दिला. त्यानंतर भारताने मालिका 1-0 अशी जिंकली.

त्यानंतर दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेचा निकाल समसमान राहिला, परंतु जेतेपदाचे पारडे अनेकदा भारताच्या बाजूने राहिले.  मे 2002नंतर वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध कसोटी सामनाच नव्हे तर मालिकाही जिंकता आलेली नाही. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांना हा कटू इतिहास पुसण्याची संधी आहे. दोन देशांमध्ये आतापर्यंत 96 कसोटी सामने खेळले गेले. त्यापैकी 30 सामने विंडीजने,तर 20 सामने भारताने जिंकले. उर्वरित 46 सामने अनिर्णित राहिले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील दहा कसोटींमध्ये भारताने सात सामने जिंकले आहेत. 2002-03 नंतर झालेल्या सातही कसोटी मालिकांमध्ये भारताने बाजी मारली आहे. या सात मालिकांमध्ये भारताने 12 सामने जिंकले आणि 9 सामने अनिर्णित राखले. 

1958-59 च्या दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजने 8 बाद 644 धावांवर डाव घोषित केला होता. भारताविरुद्धची त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने 2018-19च्या राजकोट कसोटीत 9 बाद 649 धावांची खेळी करताना सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. 

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पाचवेळा 100 हून कमी धावा केल्या आहेत. 1987-88च्या दिल्ली कसोटीत भारताचा डाव 75 धावांत गडगडला होता, तर 2006मध्ये वेस्ट इंडिजला 103धावांत गुंडाळले होते.  

भारताविरुद्ध सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम अजूनही रोहन कन्हाई यांच्या नावार आहे. 1958-59च्या कोलकाता कसोटीत कन्हाई यांनी 256 धावा केल्या होत्या. भारतासाठी सुनील गावस्कर यांनी 1983-84 मध्ये चेन्नई कसोटीत विंडीजविरुद्ध 236 धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.

वेस्ट इंडिजने 5 बाद 614 धावांत डाव घोषित केला होता आणि प्रत्युत्तरात भारताला ( 124 व 154) दोन्ही डावांत अपयश आले. भारताला एक डाव व 336 धावांनी नमवून वेस्ट इंडिजने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली होती. 


जॅक नोरेईगाने 1970-71च्या कसोटीत विंडीजविरुद्ध 95 धावांत 9 फलंदाज बाद केले होते. कपिल देवे 1983-84मध्ये हा विक्रम मोडताना 83 धावांत 9 विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या एका डावात नऊ विकेट घेणारा कपिल हा एकमेव कर्णधार आहे.  
 

Web Title: India vs West Indies Test : In Stats: Windies Yet to Win a Test Match Against India in 17 Yrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.