भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतील पहिला ट्वेंटी-20 सामना शुक्रवारी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. शिखर धवनला दुखापतीमुळे ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घ्यावी लागल्यानं लोकेश राहुल आणि रोहित शर्मा सलामीला येण्याची शक्यता अधिक आहे. या सामन्यात राहुलला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एका विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. राहुल हा विक्रम करण्यात यशस्वी झाल्यात तो थेट माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्या पंक्तित जावून बसेल.
राहुलनं ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 974 धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त 1000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 26 धावांची आवश्यकता आहे आणि हा पल्ला पार करणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरू शकतो. धोनी, विराट, रोहित शर्मा,
शिखर धवन, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी हा पराक्रम केला आहे. या विक्रमात रोहित 2539 धावांसह आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहित अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ 2450 धावांसह कोहली दुसऱ्या स्थानी आहे.
राहुलनं 28 डावांमध्ये 41.34 च्या सरासरीनं 974 धावा केल्या आहेत आणि त्याला कोहलीनंतर सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रमही खुणावत आहे. कोहलीनं 27 डावांमध्ये हा पल्ला पार केला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच ट्वेंटी-20त 26 धावा करण्यात यशस्वी झाल्यास राहुल आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा जगातला तिसरा फलंदाज ठरले. या विक्रमात पाकिस्तानचा बाबर आझम ( 26 डाव) अव्वल स्थानावर आहे.
बांगलादेशविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत राहुलनं एका अर्धशतकी खेळीसह 75 धावा केल्या होत्या. शिवाय मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेतही त्याची कामगिरी साजेशी झाली आहे. भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवले, तर ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय नोंदवला.
![]()
- भारतीय संघ ट्वेंटी-20 -विराट कोहली, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.
- वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स,
विंडीज मालिकेचे वेळापत्रक
⦁ ट्वेंटी-20 मालिका
6 डिसेंबर - हैदराबाद
8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम
11 डिसेंबर - मुंबई
⦁ वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक