भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात शिवम दुबेनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. कर्णधार विराट कोहलीनं त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी दिली. त्यानं जोरदार फटकेबाजी करून विराटचा हा विश्वास सार्थ ठरवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या या खेळाडूनं पुन्हा एकदा कॅप्टन कोहलीला खूश केलं. त्यानं पोलार्डच्या एका षटकात तीन खणखणीत षटकार खेचले. शिवमनं दमदार फटकेबाजी केली आणि नंतर ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतकही पूर्ण केले. त्याचा हा झंझावात हेडन वॉल्श ज्युनियरनं थांबवला. 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्यानं शिवमला हेटमायर करवी झेलबाद केले. शिवमने 30 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा चोपल्या.
मुंबईच्या या खेळाडूला लहानपणी त्याच्या वडिलांनी प्रॅक्टीस दिली. या खेळाडूला प्रत्येक दिवशी पाचशे चेंडूंची ते प्रॅक्टीस द्यायचे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून खेळणारा तो 82 वा खेळाडू आहे. शिवम चार वर्षांचा असताना त्याच्यातील गुणवत्ता त्यांच्या घरातील एका नोकरानं ओळखली. त्याने या खेळाडूच्या वडिलांना सांगितले की, तुमच्या मुलामध्ये चांगली गुणवत्ता आहे. त्यानंतर या खेळाडूंच्या वडिलांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि त्यांनी त्याला प्रॅक्टीस द्यायला सुरुवात केली.
शिवमने 16 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 48.19 च्या सरासरीनं 1012 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतकांचा आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 43.85 च्या सरासरीनं 614 धावा आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 19 सामन्यांत 242 धावा केल्या आहेत. आतापर्यंत चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत शिवमनं 3 विकेट्स घेतल्या आहेत.